Advertisement

नवी मुंबईत वाहन फिटनेस टेस्टिंग आता 12 मिनिटांत

RTOचा Automated Testing Station लवकरच सुरू

नवी मुंबईत वाहन फिटनेस टेस्टिंग आता 12 मिनिटांत
SHARES

नवी मुंबईतील मालवाहू वाहने, प्रवासी वाहने आणि इतर ट्रान्सपोर्ट श्रेणीतील वाहनांच्या फिटनेस टेस्टिंगची प्रक्रिया आता अधिक वेगवान आणि पारदर्शक होणार आहे. नवी मुंबई RTOकडून उभारण्यात आलेले Automated Testing Station (ATS) पुढील आठवड्यापासून सुरू करण्याची तयारी करण्यात आली आहे.

या ऑटोमेटेड टेस्टिंग सेंटरचे काम जवळपास पूर्ण झाले असून, ते कार्यान्वित झाल्यानंतर वाहनमालकांचा वेटिंग टाइम कमी होण्यासोबतच फिटनेस प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेत मानवी हस्तक्षेपही कमी होणार आहे.

12 चाचण्या अवघ्या 12 मिनिटांत

केंद्र सरकारच्या निर्देशांनुसार ट्रान्सपोर्ट श्रेणीतील वाहनांची फिटनेस चाचणी Automated Testing Stationच्या माध्यमातून करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

सध्या वाहनांची फिटनेस तपासणी मॅन्युअली केली जाते. त्यामुळे प्रत्येक वाहनाला बराच वेळ लागतो आणि टेस्टिंग ट्रॅकवर वाहनांच्या रांगा लागतात. मात्र, नव्या ऑटोमेटेड यंत्रणेत सुमारे 12 वेगवेगळ्या चाचण्या अवघ्या 12 मिनिटांत पूर्ण होणार आहेत. सध्याच्या प्रक्रियेला जवळपास 20 मिनिटे लागतात.

वाहनाच्या कोणकोणत्या चाचण्या होणार?

ATSमध्ये मशीन, कॅमेरे आणि संगणकीकृत यंत्रणांच्या माध्यमातून वाहनाची रोडवर्थिनेस तपासली जाणार आहे.

  • ब्रेक टेस्ट – ब्रेकची कार्यक्षमता आणि चारही चाकांवरील ब्रेकिंग फोर्स तपासला जाईल.

  • हेडलाइट अलाइनमेंट – हेडलाइटची तीव्रता आणि प्रकाशाचा योग्य कोन तपासला जाईल.

  • पॉल्युशन टेस्ट – वाहनातून बाहेर पडणाऱ्या धुराचे प्रमाण आणि उत्सर्जन तपासले जाईल.

  • साइड-स्लिप टेस्ट – वाहनाच्या चाकांचे अलाइनमेंट योग्य आहे की नाही, हे तपासले जाईल.

  • सस्पेन्शन टेस्ट – शॉक अॅब्झॉर्बर आणि सस्पेन्शनची कार्यक्षमता तपासली जाईल.

  • हॉर्न आणि नॉइज टेस्ट – हॉर्न आणि इंजिनचा आवाज निर्धारित डेसिबल मर्यादेत आहे की नाही, हे तपासले जाईल.

  • अंडरबॉडी इन्स्पेक्शन – कॅमेऱ्यांच्या मदतीने चेसिस, सस्पेन्शन, स्टीअरिंग पार्ट्स आणि गळती तपासली जाईल.

  • स्पीडोमीटर टेस्ट – स्पीडोमीटर योग्य वेग दाखवत आहे की नाही, हे तपासले जाईल.

  • व्हेईकल आयडेंटिफिकेशन – चेसिस नंबर, इंजिन नंबर आणि HSRP नंबरची VAHAN डेटाबेसशी पडताळणी केली जाईल.

  • व्हिज्युअल इन्स्पेक्शन – विंडशील्ड, काचा, रिफ्लेक्टिव्ह टेप, इंडिकेटर्स, वायपर्स, रिअर-व्ह्यू मिरर आणि टायर्स तपासले जातील.

  • इंजिन इन्स्पेक्शन – OBD स्कॅनरच्या माध्यमातून इंजिनमधील संभाव्य बिघाड आणि उत्सर्जनाशी संबंधित माहिती तपासली जाईल.

  • सेफ्टी सिस्टिम्स – वाहनामध्ये बसवण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक सुरक्षा यंत्रणांचीही तपासणी केली जाईल.

प्रक्रिया होणार डिजिटल

नवी मुंबईचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दत्तात्रय सांगोलकर यांच्या माहितीनुसार, सर्व ट्रान्सपोर्ट श्रेणीतील वाहनांची फिटनेस टेस्ट ATSच्या माध्यमातून केली जाणार आहे.

ऑटोमेटेड आणि संगणकीकृत प्रक्रियेमुळे वाहनांची तपासणी निर्धारित निकषांनुसार होईल आणि त्याची नोंद डिजिटल पद्धतीने केली जाईल. त्यामुळे फिटनेस टेस्टिंगमध्ये पारदर्शकता आणि एकसमानता वाढण्यासोबतच विलंब आणि मानवी हस्तक्षेप कमी होण्याची शक्यता आहे.

यामुळे नवी मुंबईतील वाहनमालकांना फिटनेस प्रमाणपत्रासाठी लागणारा वेळ कमी होऊन प्रक्रिया अधिक सुलभ होण्याची अपेक्षा आहे.



हेही वाचा

मुंबई विमानतळावर मोठे फेरबदल

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा