
मिळालेल्या माहितीनुसार, घोडबंदर रोडवरील हिरानंदानी इस्टेट परिसरात या विद्यार्थ्याचे कुटुंब राहते. त्याला कोलकात्यातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग सायन्स अँड टेक्नॉलॉजी (IIEST), शिबपूर येथे BS-MS ड्युअल डिग्री अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायचा होता.
या विद्यार्थ्याने नुकतीच बारावीची परीक्षा पूर्ण केली होती. त्याला 95.7 टक्के गुण मिळाले होते. मात्र, प्रवेशासाठीच्या अॅप्टिट्यूड टेस्टमध्ये त्याला 10,474 क्रमांक मिळाल्याने त्याला पसंतीच्या संस्थेत प्रवेश मिळू शकला नाही.
पोलिसांच्या माहितीनुसार, 4 सप्टेंबर रोजी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास विद्यार्थी सायकल चालवण्यासाठी बाहेर जात असल्याचे सांगून घरातून निघाला.
सुमारे 45 मिनिटांनंतर त्याने कुटुंबाच्या WhatsApp ग्रुपवर एक मेसेज केला. या मेसेजमधून त्याने स्वतःचे जीवन संपवण्याचा इरादा व्यक्त केल्याचे पोलिसांनी सांगितले.
कुटुंबीयांनी त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा फोन बंद असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने कासारवडवली पोलिसांना माहिती दिली.
यानंतर पोलिस आणि कुटुंबीयांनी परिसरात त्याचा शोध सुरू केला.
मात्र, पोलिस आणि कुटुंबीय हस्तक्षेप करण्यापूर्वीच विद्यार्थ्याने निवासी इमारतीतील 22व्या मजल्यावरील रिफ्यूज एरियातून उडी घेतल्याचे समोर आले.
तो गंभीर जखमी अवस्थेत इमारतीजवळील पदपथावर आढळला. पोलिस आणि कुटुंबीयांनी त्याला तातडीने ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले.
या प्रकरणात कोणत्याही प्रकारचा घातपात झाल्याचा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केलेला नाही, असे पोलिसांनी सांगितले.
आवडत्या संस्थेत प्रवेश न मिळाल्याने विद्यार्थ्यावर मोठा शैक्षणिक मानसिक ताण आला होता, असा कुटुंबीयांचा प्राथमिक अंदाज आहे.
या प्रकरणी विद्यार्थ्याच्या वडिलांनी दिलेल्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी Accidental Death Report (ADR) नोंदवला असून, पुढील तपास सुरू आहे.
हेही वाचा
