सर्वोच्च न्यायालयाकडून महापालिकेचं कौतुक, भाजप मात्र विरोधाचीच ढोलकी बडवतंय- महापौर

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

सर्वोच्च न्यायालयाकडून मुंबई महापालिकेच्या कोविड काळातील कामाचं कौतुक होत असताना देखील भाजप मात्र या ना त्या प्रकारे विरोधाचीच ढोलकी बडवण्याचं काम करत आहे, अशा शब्दांत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (kishori pednekar) यांनी भाजपवर हल्ला चढवला. 

मुंबईत प्रसारमाध्यमांशी त्या बोलत होत्या. यावेळी किशोरी पेडणेकर म्हणाल्या, मुंबई महापालिका शहरातील सर्व नागरिकांना महापालिका आणि सरकारी रुग्णालयाच्या माध्यमातून मोफत कोरोना प्रतिबंधक लस देत आहे. तर खासगी रुग्णालय लसीकरणासाठी नागरिकांकडून पैसे घेत आहे.

खासगी रुग्णालयांकडून घेण्यात येणाऱ्या २५० रुपयांपैकी १५० रुपये हे केंद्र सरकारला जात आहेत आणि उरलेले १०० रुपये खासगी रुग्णालय सेवा आणि व्यवस्थापन खर्च म्हणून घेत आहे. याची माहिती न घेता, कुठलाही अभ्यास न करता भाजपचे नगरसेवक उगीच आंदोलन करत आहे. आंदोलनच करायचं असे आणि खासगी रुग्णालयातही मोफत लसीकरण व्हावं, असं वाटत असल्यास आपण सर्व मिळून केंद्राकडे जाऊ आणि त्यांना लसीमागे १५० रुपये न घेण्याची विनंती करू, असं किशोरी पेडणेकर यांनी सुचवलं.

कोरोनाचं (coronavirus) संकट हे वैश्विक संकट आहे, याची जराही तमा न बाळगता भाजपकडून राज्य सरकारवर सातत्याने टीका केली जाते, सरकार हलवण्याचा प्रयत्न केला जातो. तरीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मोठ्या निग्रहाने राज्यातील जनतेला अधिकाधिक सुविधा मिळवून देण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करत आहेत. 

हेही वाचा- मुंबईच्या रेल्वे स्थानकांवर मिळणार ऑक्सिजन, मध्य रेल्वे उभारणार ‘ऑक्सिजन पार्लर’

विरोधकांना प्रश्न

विरोधकांना प्रश्न पडलाय की सर्वोच्च न्यायालयाने महापालिकेचं (bmc) कौतुक का केलंय ते? महापालिकेने रेमडेसिवीरचा तुटवडा पडलेला असतानाही कधी कुठल्या रुग्णाला चिठ्ठी लिहून दिली नाही की ते आणा म्हणून. प्रत्येक रुग्णालयाला तेवढा साठा देऊन ठेवला आणि रेमडेसिवीर वापराला मर्यादाही घातल्या. मोठ्या प्रमाणात चाचण्या वाढवल्या, शहरातील गर्दीची ठिकाणं कमी केली. बेड मॅनजेमेंट केलं, वाॅर रुम तयार केले. तक्रारी आल्यावर सातत्याने पाहणी करत दुरूस्त्या केल्या, असं किशोरी पेडणेकर यांनी स्पष्ट केलं.

गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न

या सर्व कौतुकास पात्र मुंबईकर आहेत. कारण मुंबईकर (mumbai) सर्व नियम पाळत आहेत, संयम दाखवत आहेत. म्हणूनच संसर्ग हळूहळू कमी होऊ लागला आहे. भाजपने ज्या प्रकारे मोफत लसीसाठी आंदोलनाचा फार्स केला. त्याऐवजी केंद्राकडून जास्तीत जास्त लस येऊ द्या यासाठी आंदोलन करायला हवं. मुख्यमंत्री देखील त्यासाठी प्रयत्नशील आहे. ते सातत्याने केंद्राकडे लसींची मागणी करत आहेत.

केंद्राकडून जसजसी लस मिळत आहेत, तसतसं आपण तिचं वाटप करत आहोत. पण काहीजण लोकांमध्ये गोंधळ निर्माण करण्याचं प्रयत्न करत आहेत. अमूक एका केंद्रावर जास्त लसी आहेत, असं सांगून त्याठिकाणी गर्दी वाढवत आहेत. पण आजही आमचं लोकांना सांगणं आहे की कोविन वरून मेसेज आल्यानंतरच घराबाहेर पडा, असा सल्ला पुन्हा एकदा किशोरी पेडणेकर यांनी दिला.

केंद्रातून येणाऱ्या लशी अपुऱ्या असल्याने त्याचा लसीकऱणावर परिणाम होत आहे. त्याचा फायदा घेऊन अनेक लोक चुकीचे संदेश देऊन जनतेची दिशाभूल करण्याचं काम करत असल्याचंही त्यांनी सांगितलं. मोफत लसींप्रमाणेच मुबलक लसींसाठीही मागं लागायला हवं असंही त्या म्हणाल्या.

हेही वाचा- मास्कविना फिरणाऱ्यांकडून ५४ कोटींचा दंड वसूल

पुढील बातमी
इतर बातम्या