Advertisement

मध्य रेल्वे उभारणार ‘ऑक्सिजन पार्लर’

मध्य रेल्वेने याआधी नाशिक रोड स्थानकात हवा शुद्धीसाठी ‘ऑक्सिजन पार्लर’ उभारलं आहे. त्याच धर्तीवर मुंबईतील रेल्वे स्थानकात 'ऑक्सिजन पार्लर' उभारण्याची योजना आहे.

मध्य रेल्वे उभारणार ‘ऑक्सिजन पार्लर’
SHARES

मुंबईतील वाढत्या प्रदुषणामुळे स्वच्छ आणि शुद्ध ऑक्सिजन मिळणं कठीणच बनलं आहे. पण हाच ऑक्सिजन २४ तास मिळण्यासाठी आता रेल्वे स्थानकांवर ‘ऑक्सिजन पार्लर’ तयार करण्यात येणार आहे.

मध्य रेल्वे मागील काही वर्षांपासून पर्यावरणाच्या संरक्षणासाठी महत्वपूर्ण योजना राबवत आहे. आता मुंबईच्या रेल्वे स्थानकांवर  मध्य रेल्वे ‘ऑक्सिजन पार्लर’ (रोप वाटिका) उभारणार आहे. रेल्वे स्थानकात पर्यावरणस्नेही वातावरण निर्माण करण्यासाठी रेल्वेकडून हा प्रयत्न केला जात असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

मध्य रेल्वेने याआधी नाशिक रोड स्थानकात हवा शुद्धीसाठी ‘ऑक्सिजन पार्लर’ उभारलं आहे. त्याच धर्तीवर मुंबईतील रेल्वे स्थानकात 'ऑक्सिजन पार्लर' उभारण्याची योजना आहे. यामध्ये १८ प्रकारची सर्वाधिक ऑक्सिजन देणारी रोपटे लावण्यात येणार आहेत.

‘ऑक्सिजन पार्लर’ उभारण्यासाठी मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस, दादर टर्मिनस, ठाणे आणि कल्याण रेल्वे स्थानकांचं सर्वेक्षण करण्यात आलं आहे. येत्या काही दिवसांत ‘ऑक्सिजन पार्लर’साठी निविदा काढण्यात येणार आहे. लवकरच ही निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यावर  ३ ते ४ महिन्यांत ‘ऑक्सिजन पार्लर’ उभारण्यात येणार आहे. 

देशातील पहिले ‘ऑक्सिजन पार्लर’ नाशिक रेल्वे स्टेशनवर तयार करण्यात आलं आहे. स्नेक प्लांट, आरेलिया बुश, ड्रॅगन बांबू, चायनीज बांबू, मनीप्लँट, झामीया, झेड प्लांट, बोनझा अशी झाडं येथे लावण्यात आली आहेत. ही सर्व झाडं प्रदूषण दूर करून ऑक्सिजन निर्माण करण्याचं काम करतात.

भारतीय रेल्वेचे उत्पादन वाढविण्यासाठी न्यू इनोव्हेटिव्ह नॉन फेअर रेव्हेन्यू आयडीयाज स्कीम म्हणजेच एनआयएनएफआरआयएसमार्फत अनेक योजना राबवल्या जातात. त्याचाच एक भाग म्हणून ‘ऑक्सिजन पार्लर’ सुरु करण्यात आलं आहे. ऑक्सिजन पार्लरच्या माध्यमातून रेल्वेला वर्षाला ७५ हजार रुपयांचा महसूल मिळत आहे. त्याचबरोबर पर्यावरण रक्षणालाही हातभार लागत आहे.



हेही वाचा

मास्कविना फिरणाऱ्यांकडून ५४ कोटींचा दंड वसूल

मुंबईत पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत पुन्हा वाढ

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा