मुंबईत पाणी तुंबलं, महापौरांनी नाही पाहिलं

  • मुंबई लाइव्ह टीम & नवनाथ भोसले
  • सिविक

रविवारी रात्रीपासून मुंबईत जोरदार पावसाला सुरूवात झाली. पावसाचा हा जोर सोमवारी दुपारपर्यंत होता. त्यामुळे मुंबई अाणि उपनगरातील सखल भागात पाणी तुंबलं. याचा फटका कामावर जाणाऱ्यांना बसला. असं असताना मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना मात्र मुंबईत तुंबलेलं पाणी दिसलं नाही. मुंबईत पाणी तुंबलंच नाही असा अजब दावा महापौरांनी केला अाहे. महापौरांच्या या दाव्याचा नेटकऱ्यांनी चांगलाच समाचार घेतला अाहे. तर अामदार अाशिष शेलार यांनीही महापौरांच्या या विधानावर टीका केली अाहे.

पावसानंतर पळून दाखवलं

कालपासून पाऊस कोसळत आहे. पाऊस थांबतो की नाही, असं वाटत होतं. काही ठिकाणी पाणी साचलं मात्र तुंबलेलं नाही, असं महापौर म्हणाले. शिवसेना अाणि भाजपमध्येही यावरून अारोप-प्रत्यारोप सुरू झाले अाहेत.अामदार अाशिष शेलार यांनीही महापौर विश्वनाथ महाडेश्वरांवर टीका केली. 'करुन दाखवलं' म्हणणाऱ्यांनी पावसानंतर 'पळून दाखवलं' अशा शब्दात शेलार यांनी महापौरांचा समाचार घेतला. अनेक ठिकाणी पाणी तुंबल्यामुळे शिक्षक-पदवीधर निवडणुकीच्या मतदानासाठी मतदार  मतदान केंद्रापर्यंत पोहचू शकले नाहीत. पालिकेतील सत्ताधाऱ्यांना अापली जबाबदारी झटकता येणार नाही, असंही शेलार म्हणाले.

उद्धव ठाकरेही महापौरांशी सहमत 

महापौरांनी पाणी न तुंबल्याचा अजब दावा केल्यानंतर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही त्यांचीच री ओढली अाहे.  गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाणी कमी तुंबलं असं उद्धव यांनी म्हटलं आहे. सोमवारी उद्धव ठाकरे यांनी महापालिकेच्या मुख्यालयात जाऊन आपत्कालीन विभागासोबत चर्चा केली. यावेळी मुंबईतील भूभाग समुद्रसपाटीपासून खाली असल्यामुळे काही वेळ पाणी साचत असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.


हेही वाचा -

काकाला पुतण्याची भीती का? रामदास कदम यांचा राजला टोला

राज्याच्या महाधिवक्त्यांनाही राज्यमंत्री पदाचा दर्जा


पुढील बातमी
इतर बातम्या