मुंबई, ठाण्यातील सर्व दुकानं खुली

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईसह राज्यभरात (maharashtra) कोरोनाची दुसरी लाट आता ओसारतेय. रुग्णांच्या संख्येत मोठी घट होत असल्यानं आता राज्य सरकारनं लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणली आहे. त्यानुसार, मुंबईसह ठाणे जिल्हा, पुणे-पिंपरी आदी ठिकाणी मंगळवार १ जूनपासून सर्व दुकानं २ वाजेपर्यंत उघडी ठेवता येणार आहेत. कोरोनाबाधितांचे (coronavirus) प्रमाण १० टक्क्यांहून कमी असलेल्या ठिकाणी राज्य सरकारनं निर्बंध शिथिल करण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनांना दिले आहेत. त्यानुसार मुंबईसह अनेक पालिका, स्थानिक प्रशासनांनी सोमवारी आदेश काढून निर्बंध अंशत: शिथिल केले.

मुंबईत सध्या दररोज ३० हजार करोना चाचण्या केल्या जात असून, चाचण्यांच्या तुलनेत बाधितांचे प्रमाण पाच टक्क्यांच्या खाली आहे. त्यामुळे मुंबईत मंगळवारपासून अत्यावश्यक सेवेसह सर्व दुकाने खुली ठेवण्यास पालिकेनं परवानगी दिली.

मुंबईत पहिल्या आठवड्यात रस्त्याच्या उजव्या बाजूकडील दुकाने सोमवार, बुधवार व शुक्रवारी खुली राहतील. त्याच आठवड्यात डाव्या बाजूकडील दुकाने मंगळवार, गुरुवारी खुली राहतील. दुसऱ्या आठवड्यात रस्त्याच्या डाव्या बाजूकडील दुकाने सोमवार, बुधवार व शुक्रवारी खुली राहतील तर उजव्या बाजूकडील दुकाने मंगळवार, गुरुवारी खुली राहतील. तसेच सर्व व्यापारी आस्थापनांना अंतर नियम, मुखपट्टीचा वापर आदींचे तंतोतंत पालन करणे अनिवार्य राहील.

ठाणे जिल्ह्यातही अत्यावश्यक सेवेसह सर्व दुकाने सकाळी ७ ते दुपारी दोनपर्यंत सुरू ठेवता येतील. या निर्णयामुळे मंगळवारपासून जिल्ह्य़ातील ठाणे महापालिका क्षेत्र, कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्र, मीरा भाईंदर, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि ग्रामीण क्षेत्रातील बाजारपेठा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नव्या आदेशानुसार शहरातील मॉल आणि शॉिपग सेंटर बंदच राहणार आहेत.

नियम काय?

  • अत्यावश्यक सेवेतील दुकाने आठवडाभर खुली. 
  • अन्य दुकानांना सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत मुभा.
  • मॉल्स, शॉपिंग सेंटरना मनाई.
  • अत्यावश्यक वस्तूंबरोबर अन्य वस्तूही ई-कॉमर्स माध्यमातून वितरीत करण्यास मुभा.
  • हॉटेलमधून केवळ घरपोच सुविधा उपलब्ध.
  • दुपारी २ नंतर नागरिकांना विनाकारण फिरण्यास बंदी.


हेही वाचा - 

परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नवी मुंबईत १ जूनला विशेष लसीकरण सत्र

शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्यांचे होणार Walk In Vaccination, 'या' रुग्णालयांमध्ये लसीकरणाची सुविधा


पुढील बातमी
इतर बातम्या