गेल्या 10 दिवसांत, मुंबई पोलिसांनी “डिजिटल अरेस्ट स्कॅम”च्या (Digital Arrest) वाढत्या फसवणूक प्रकरणांवर मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणी सात जिल्ह्यांमधून 13 संशयितांना अटक केली आहे. या वर्षी अशा प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ होत असल्याने 18 नोव्हेंबर रोजी यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली होती.
ऑक्टोबरपर्यंत शहरात 142 डिजिटल अरेस्ट स्कॅम नोंदवले गेले असून 114 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
या फसवणुकीत गुन्हेगार CBI किंवा ED च्या अधिकाऱ्यांच्या नावाने लोकांना फोन करतात. ते प्रामुख्याने वयोवृद्ध व्यक्तींना लक्ष्य करतात. त्यांना सांगतात की त्यांच्या बँक खात्यातून बेकायदेशीर व्यवहार केले जात आहेत. त्यानंतर ते पीडितांना तासंतास व्हिडिओ कॉलवर ठेवतात आणि त्याला “डिजिटल अरेस्ट” असे म्हणतात. कायदेशीर दृष्ट्या अशा कोणत्याही संकल्पनेला मान्यता नाही, पण सायबर गुन्हेगार हे तंत्र मोठ्या प्रमाणावर वापरत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सायबर फसवणुकीत वापरल्या गेलेल्या बँक खात्यांशी संबंधित पत्त्यांवर धाडी टाकण्यासाठी 13 पथके तयार करून पाठवण्यात आली. या खात्यांमधून पीडितांकडून उकळलेले पैसे फिरवले जात होते. ही पथके मुंबई आणि आसपासच्या भागांतच नव्हे, तर सोलापूर, पुणे, नागपूर, सातारा आणि नाशिक येथेही रवाना झाली.
या कारवाईत नाशिक आणि मुंबईतून तीन संशयित, मुंबईतून आणखी दोघे, आणि उर्वरित प्रत्येक जिल्ह्यातून एक अशा 13 जणांना अटक करण्यात आली. यापैकी बहुतेक जण म्युल अकाउंट (mule accounts) म्हणजेच फसवणुकीसाठी वापरली जाणारी बोगस बँक खाती वापरणारे होते. त्यांनी आपली बँक माहिती सायबर गुन्हेगारांना दिली होती, ज्यामधून पैशांचा अनेक स्तरांतून फेरफार करण्यात आला.
नंतर हे पैसे क्रिप्टोकरन्सीमध्ये रूपांतरित करून देशाबाहेर पाठवण्यात आले. म्युल अकाउंट धारकांना सहसा या रकमेतील काही हिस्सा मिळतो.
अटक करण्यात आलेल्या व्यक्तींची नावे पुढीलप्रमाणे:
सुनिल काशीनाथ भुजबळ (45) – सोलापूर,
अनंत माणिक थोरात (55) – जुन्नर (पुणे),
विलास मोरे उर्फ रेहान खान (43),
जयेेश जयंंत झावेरी (55) – विरार,
रिजवान शौकत अली खान (34),
ध्रुमिल रामबिया (32),
कासिम रिजवान शेख (32),
जीवन बरपटरे (36),
यश यादव (23),
आशीष रामकृष्ण भुसारी (41),
मोहन सोनवणे,
हेतेश मसुरकर (30),
आणि अंकुश मोरे.
पलिसांनी ज्येष्ठ नागरिकांचा डेटाबेस तयार केला आहे. कारण ते या स्कॅमचे सर्वात जास्त बळी ठरतात. दक्षिण मुंबईत ही मोहीम सुरू झाली, जिथे झोन 1 मधील अशा 627 ज्येष्ठ नागरिकांची ओळख पटली. अधिकाऱ्यांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांना सतर्क केले आणि ही फसवणूक कशी केली जाते याची माहिती दिली.
हेही वाचा