बर्थडे सेलिब्रेशनवेळी 5 मित्रांनी मित्राला पेट्रोल टाकून पेटवलं

पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (Bharatiya Nyaya Sanhita) अंतर्गत कलम 110 नुसार खुनाचा प्रयत्न या अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

बर्थडे सेलिब्रेशनवेळी 5 मित्रांनी मित्राला पेट्रोल टाकून पेटवलं
SHARES

वाढदिवसाचे सेलिब्रेशन करत असताना एका तरुणाला त्याच्याच मित्रांनी जिवंत जाळून टाकण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. केवळ मस्ती म्हणून हे कृत्य केल्याचे त्यांनी कुर्ला पोलिसांना सांगितले.

मुंबईतल्या कुर्ला परिसरातील ही घटना आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून तो व्हिडीओ व्हायरल होत आहे. या प्रकरणी पोलिसांनी 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली. या घटनेमुळे मुंबईत खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, कुर्ला पश्चिम येथील कोहिनूर फेज - 3 बिल्डिंगमध्ये ही धक्कादायक घटना घडली. याठिकाणी 21 वर्षीय तरुणाचा वाढदिवस होता. त्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्याचे 5 मित्र आले होते.

केक कापत असताना या तरुणाच्या मित्रांनी त्याच्या अंगावर पेट्रोल टाकून त्याला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून हा थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या तरुणाला पेटवून दिल्यानंतर त्याचे मित्र त्याठिकाणी डान्स करताना सीसीटीव्हीत दिसत आहेत.

वाढदिवसाच्या आदल्या दिवशी रात्री त्याच्या मित्रांचा फोन आला आणि त्यांनी त्याला भेटायला बोलावले. त्याचे मित्र आयाज मलिक, अशरफ मलिक, कासिम चौधरी, हुजैफा खान आणि शरीफ शेख अबुलसाठी केक घेऊन आले होते. परंतु त्याला पाहताच त्यांनी त्याच्यावर दगड फेकायला सुरुवात केली. त्यानंतर आयाजने अचानक पेट्रोलची बाटली काढून अबुलवर ओतायला सुरुवात केली.

“अबुलला पेट्रोलचा वास येताच तो सुटण्याचा प्रयत्न करू लागला. पण इतरांनी त्याला पकडले आणि अशरफने लायटरने त्याला पेटवून दिले, अशी तक्रार आहे. अबुल मदतीसाठी ओरडू लागला, पण मित्र तिथून पळून गेले,” असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

अबुलने कसाबसा आपला शर्ट काढला आणि एका वॉचमनकडून मिळालेल्या बाटलीतील पाणी स्वतःवर ओतले. मित्रांपैकी हुजैफा पुन्हा परत आला आणि त्याने अबुलला रुग्णालयात नेले. अबुलच्या डोक्याला, चेहऱ्याला, कानांना, हातांना आणि छातीला भाजल्या असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

या घटनेमुळे मुंबई हादरली. या घटनेमध्ये तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच कुर्ला पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी 5 तरुणांविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली.



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा