मुंबईतील रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईतील रस्ते वाहतूक चांगली व्हावी यासाठी रस्त्यांची करण्यात येते. तसंच, पावसाळ्यात होणारे रस्ते अपघात टाळण्यासाठी रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यात येतात. मात्र, कितीही डागडुजीचं काम केलं तरी, पावसाळ्यात रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण होतं. यंदाही असंच साम्राज्य तयार झालं असून, प्रवास करणं कठीण झालं आहे. दरम्यान, मुंबईतील रस्त्यांवरील प्रवास खड्डेमुक्त व्हावा, यासाठी गतवर्षी मोठ्या प्रमाणात मोहीम राबवणाऱ्या मुंबई महापालिकेचे यंदा मात्र, खड्ड्यांकडं दुर्लक्ष झालं आहे. 

पावसामुळं मुंबईतील अनेक रस्त्यांची दुर्दशा झाली असून, महापालिकेनं अलीकडंच बांधलेल्या रस्त्यांवरही खड्डे पडल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. महापालिकेनं मात्र, आपल्या अ‍ॅपवर येणाऱ्या तक्रारींचा हवाला देत शहरात केवळ ५०० खड्डे असल्याचा दावा केला आहे. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आल्यामुळं रस्त्यावरील वाहतूक कमी असली, तरी खड्ड्यांच्या तक्रारी होतच आहेत. 

खड्ड्यांची तक्रार स्वीकारण्याकरिता महापालिकेनं मोबाइल अ‍ॅप सुरू केलं आहे. यावर रस्त्यावरील खड्ड्यांची छायाचित्रं काढून अपलोड करता येतात. यावर आतापर्यंत ५२० तक्रारी आल्या असून ३८४ खड्डे बुजवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. महापालिकेने तक्रारीसाठी २४ विभागांसाठी रस्ते अभियंत्यांचे व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक जाहीर केले आहेत. त्याचबरोबर १८००२२१२९३ या मोफत मदत क्रमांकावरही तोंडी तक्रार करता येते.

खड्डे बुजविण्यासाठी महापालिकेनं या वर्षी ११५० टन कोल्डमिक्स विभाग कार्यालयांमध्ये वितरित केलं आणि तक्रारी ताबडतोब मार्गी लावण्याबाबत सूचना दिल्या. गरज लागल्यास आणखी कोल्डमिक्स दिले जाणार असल्याचं समजतं.

गोवंडीतील मानखुर्द लिंक रोडवर मोठ्या प्रमाणावर खड्डे आहेत. दादर सर्कल येथील पालिकेच्या कार्यालयासमोरील रस्त्यावरच मोठमोठे खड्डे आहे. माटुंगा स्थानक, माझगाव लवलेन, शीव-धारावी मार्गावरही हीच परिस्थिती आहे. महापालिकेनं अलीकडंच वाहतुकीला खुल्या केलेल्या जुहू पुलावरही खड्डे पडल्यानं रस्त्याच्या बांधकामावरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.


हेही वाचा -

मुंबईतील अनेक रुग्णालयं होणार नॉनकोविड

मोडक सागर पाठोपाठ 'ही' तलावं ओव्हरफ्लो होण्याची शक्यता


पुढील बातमी
इतर बातम्या