पाच दिवसात महिन्याच्या सरासरीपेक्षा अधिक पाऊस

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

जुलै महिन्याच्या पहिल्या पाच दिवसातच पावसाने दमदार हजेरी लावली आहे. जुलै महिन्याच्या 31 दिवसांत मिळून पडणाऱ्या पावसाच्या सरासरीहून अधिक पाऊस अवघ्या पाच दिवसांत पडला आहे.

हवामान विभागाच्या सांताक्रुज केंद्रात सरासरीहून 5 टक्के तर कुलाबा येथे 12 टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे जून महिन्यातील तूटही भरून निघाली आहे.

मुंबईत यंदा वळिवाच्या पावसाचा अभाव आणि पाऊस लांबल्याने जूनच्या पंधरवड्यात सांताक्रुज येथे 12.9 मिमी तर कुलाबा येथे केवळ 4.2 मिमी पावसाची नोंद झाली होती. त्यानंतर मोसमी पाऊस त्याच्या सरसरीवेळेहून 13 दिवस उशिराने म्हणजेच 23 जून रोजी दाखल झाला. त्यानंतर 24 जून रोजी मुंबई शहर आणि उपनरात दमदार पावसाची नोंद होऊन जूनच्या सरासरीच्या निम्मा पाऊस नोंदला गेला होता.

मात्र, काही दिवस पावसाने विश्रांती घेतली होती. जुलैमध्ये मोसमी वारे पुन्हा सक्रिय झाले. मागील पाच दिवसांपासून शहर आणि उपनगरात पावसाचा जोर कायम असून समाधानकारक पावसाची नोंद होत आहे. अवघ्या पाच दिवसात नोंदल्या गेलेल्या पावसाने संपूर्ण जुलै महिन्यात पडणाऱ्या पावसाची सरासरी ओलांडली आहे.

हवामान विभागाच्या सांताक्रुज केंद्रात जुलै महिन्यात सरासरी 855.7 मिमी पाऊस पडणे अपेक्षित असते. 1 जुलै ते 6 जुलै सकाळी 8:30 पर्यंत सांताक्रुज येथे 899.2 मिमी पाऊस नोंदला गेला जो सरासरीहून 5.1 टक्क्यांनी अधिक आहे.

तसेच कुलाबा केंद्राची एकूण सरासरी 734.1 मिमी असून येथे 823.4 मिमी पावसाची नोंद झाली आहे जो सरासरीहून 12.2 टक्के अधिक आहे.


हेही वाचा

मुंबईच्या पूरस्थितीचा 90 मिनिटे आधी इशारा मिळणार

पुढील बातमी
इतर बातम्या