बुधवारी 12 नोव्हेंबर 2025 रोजी नेचर जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अर्थमितीय विश्लेषणानुसार मुंबईतील सुमारे 8 टक्के मृत्यू अतिवृष्टी आणि पुरामुळे झाले आहेत. 80 टक्क्यांहून अधिक मृत्यू हे झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांचे झाले आहेत.
यामुळे 2006-2015 पर्यंत पावसाळ्यात सरासरी 2,500 मृत्यू झाले. अभ्यासानुसार, अतिवृष्टी आणि पुरामुळे मुलांना मृत्यूचा धोका सर्वाधिक असतो, तर पुरुषांच्या तुलनेत महिलांना जास्त धोका असतो.
ज्या दिवशी अत्यंत मुसळधार पाऊस (15 सेमी किंवा त्याहून अधिक) कोसळला त्या दिवशी शहरातील मृत्यूदर 2 टक्क्यांनी वाढला असल्याचे दिसून आले आहे.
प्रिन्सटन विद्यापीठ आणि मुंबईतील ग्रीन ग्लोब कन्सल्टिंगसह अमेरिकेच्या संस्थांमधील संशोधकांनी म्हटले आहे की, खराब ड्रेनेज सिस्टीमसारख्या अपुर्या पायाभूत सुविधांमुळे पावसाळ्यात या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
2006-2015 दरम्यान मुंबईत झालेल्या अतिवृष्टीमुळे मृत्युदर मोजण्यासाठी पथकाने मृत्यू नोंदी आणि पावसाच्या आकडेवारीचे विश्लेषण केले.
दिवसाला 150 मिलीमीटर पाऊस पडल्याने मुंबईतील एकूण मृत्युदरात 2.2 टक्के वाढ झाली आहे. तसेच झोपडपट्टीतील रहिवाशांमध्ये 2.9 टक्के वाढ झाली असल्याचे पथकाला आढळून आले.
पावसामुळे होणाऱ्या मृत्युंचे निष्कर्ष अधिकृत आकडेवारीत नोंदवलेल्या आकडेवारीपेक्षा जास्त आहेत, ज्यामुळे सुधारित ड्रेनेज, स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापनात तातडीने गुंतवणूक करण्याची आवश्यकता आहे.
भरती-ओहोटीच्या वेळी पावसामुळे होणाऱ्या मृत्यूचा धोका झपाट्याने वाढल्याचे दिसून आले. संशोधकांच्या मते, समुद्राची वाढती पातळी भरती-ओहोटीच्या परिणामांना वाढवत आहे.
हेही वाचा