गेल्या 24 तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईत जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाशी संबंधित घटनांमध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे 120 हून अधिक आपत्कालीन तक्रारींची नोंद झाली आहे. अग्निशमन दल, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) आणि पालिकेची पथके दिवसभर सतर्क होती.
बीएमसीच्या माहितीनुसार, शहरात 90 झाडे किंवा फांद्या कोसळण्याच्या, 30 शॉर्टसर्किटच्या, सहा इमारत किंवा भिंत कोसळण्याच्या घटना घडल्या. तसेच कुर्ला पश्चिम येथील बुद्धा कॉलनीत रात्री सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास दरड कोसळल्याची घटना घडली.
दरड कोसळल्यानंतर संभाव्य धोका लक्षात घेऊन एनडीआरएफ आणि बीएमसीच्या पथकांनी तत्काळ कारवाई करत परिसरातील कुटुंबांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर केले.
टेकडीच्या माथ्यावर राहणाऱ्या पाच कुटुंबांनी आधीच जागा रिकामी केली होती. तर एका दिव्यांग व्यक्तीसह उर्वरित कुटुंबालाही सुरक्षित बाहेर काढण्यात आले. टेकडीच्या पायथ्याशी राहणाऱ्या आणखी दोन कुटुंबांनाही तात्पुरत्या निवाऱ्यात हलवण्यात आले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
गेल्या 24 तासांत पश्चिम उपनगरात सर्वाधिक 109.16 मिमी, तर शहर भागात 86.94 मिमी पावसाची नोंद झाली. मुसळधार पावसामुळे अनेक भागांत झाडे उन्मळून पडली, रस्त्यांवर पाणी साचले आणि वाहतुकीवर परिणाम झाला.
दरम्यान, ठाणे शहरातही बुधवारी सकाळी पावसाचा जोर कायम होता. सकाळी 8.30 ते दुपारी 12.30 या चार तासांत 50.28 मिमी पावसाची नोंद झाली. यंदाच्या मान्सूनमध्ये ठाण्यात आतापर्यंत 461.62 मिमी पाऊस झाला असून, गेल्या वर्षी याच कालावधीत 820.24 मिमी पाऊस झाला होता.
कल्याण-डोंबिवली परिसरातही मुसळधार पावसामुळे गेल्या 24 तासांत 18 हून अधिक झाडे उन्मळून पडली. अनेक वाहनांचे नुकसान झाले, वीजपुरवठा खंडित झाला आणि वाहतुकीवर परिणाम झाला.
कल्याणच्या कालातलाव परिसरात शत्रुंजय टॉवरजवळ मोठे झाड कोसळून तीन चारचाकी आणि दोन दुचाकी वाहनांचे नुकसान झाले. तर डोंबिवली एमआयडीसी निवासी भागात झाड उच्चदाब वीजवाहिनीवर कोसळल्याने वीजपुरवठा विस्कळीत झाला.
दरम्यान, पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासनाने नागरिकांना आवश्यक तेव्हाच घराबाहेर पडण्याचे आणि सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
हेही वाचा