महापालिकेकडून चांदिवलीतील विकासकाला काम बंद करण्याची नोटीस

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईतील्या चांदीवली येथील संघर्ष नगर रस्ता पावसाच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना सोमवारी रात्री घडली. या घटनेमुळं सुरक्षेच्या दृष्टीनं प्रशासनानं परिसरातील स्थानिक इमारतीतील रहिवाशांना घरे रिकामी करण्याच्या सूचना दिल्या. या घटनेची चौकशी केली असता, संघर्षनगरमध्ये सुरू असलेल्या टोलेजंग इमारतीच्या खोदकामांमुळं येथील रस्ता खचल्याचा अंदाज प्राथमिक चौकशीतून व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळं महापालिकेनं संबंधित विकासकाला तत्काळ काम थांबविण्याची नोटीस पाठवली आहे. याआधी २०१७ मध्येही या विकासकाला महापालिकेकडून नोटीस पाठविण्यात आली होती.

४० फुटांची संरक्षण भिंत

संघर्ष नगर येथील ४० फुटांची संरक्षण भिंत कोसळल्यानं येथील ९० फुटांचा रस्ता खचला. त्यामुळं ४० फुटांवर असलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गतील ८ मजली २ इमारतींना धोका निर्माण झाला आहे. या ठिकाणी खासगी विकासकाचे बांधकाम सुरू आहे. या टोलेजंग इमारतींसाठी वाहनतळ बांधण्याकरिता खोदकाम सुरू होतं.

रस्ता खचल्याचा आरोप

याच खोदकामामुळं रस्ता खचल्याचा आरोप येथील स्थानिक रहिवासी केला असून, याबाबत पाहणी केली असता खोदकामामुळंच रस्ता खचल्याचा प्राथमिक अंदाज महापालिकेनं व्यक्त केला आहे. तसंच, महापालिकेच्या एल विभाग कार्यालयानं विकासकाला काम थांबविण्याची नोटीस दिली आहे.

सुरक्षेसाठी बॅरिकेट्स

याबाबत विकासकाला नोटीस पाठवून स्ट्रक्चरल आॅडिट, जिओ टेक्नॉलॉजिकल सर्व्हे करण्यात सांगितलं आहे. तसंच, स्थानिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं आणि एसआरएच्या त्या इमारतींच्या सुरक्षेसाठी त्या ठिकाणी बॅरिकेट्स उभे करण्यात आले आहेत.


हेही वाचा -

बेस्ट उपक्रमाच्या बसच्या भाडेकपातीला आरटीएची मंजुरी


पुढील बातमी
इतर बातम्या