महाराष्ट्रात लवकरच 'नमो सहकार टॅक्सी' या सहकारी तत्त्वावरील नव्या टॅक्सी अॅग्रिगेटर प्लॅटफॉर्मची सुरुवात होणार आहे. खासगी टॅक्सी अॅग्रिगेटर कंपन्यांकडून होणारे कथित शोषण थांबवून चालकांना थेट व्यवसायात भागीदारी देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवला जात आहे.
टॅक्सी चालक-मालक संघटना आणि चालकांच्या बैठकीत बोलताना भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी सांगितले की, या उपक्रमाला महाराष्ट्र सरकार आणि मुख्यमंत्री यांची मंजुरी मिळाली आहे. राज्याला या प्लॅटफॉर्मसाठी अॅग्रिगेटर परवानाही (Aggregator Licence) प्राप्त झाला आहे.
प्रवीण दरेकर यांनी सांगितले की, या सहकारी मॉडेलमध्ये चालक केवळ कामगार राहणार नाहीत, तर भागधारक (Shareholders) असतील. त्यामुळे व्यवसायातून मिळणारा नफा थेट चालकांनाच मिळेल.
या प्लॅटफॉर्मसाठी मोबाईल अॅप तयार करण्यात आले असून, चालकांना त्याच्या वापराचे प्रशिक्षण आणि व्यवसायाची माहिती दिली जाणार आहे.
आतापर्यंत 2,000 चालकांनी नोंदणी केली आहे.
पहिल्या टप्प्यात 2,000 टॅक्सी प्लॅटफॉर्मवर जोडल्या जाणार आहेत.
त्यापैकी 200 ते 300 टॅक्सी पुढील 15 दिवसांत प्रत्यक्ष सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे.
या योजनेअंतर्गत चालकांना:
रोजगाराची अधिक सुरक्षितता
मुलांच्या शिक्षणासाठी मदत
विमा संरक्षण
बिनव्याजी कर्ज
विविध कौशल्य प्रशिक्षण
अशा सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
तसेच, वाहतूक क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या मराठी युवकांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले जाणार असल्याचे दरेकर यांनी सांगितले.
जात, धर्म किंवा राजकीय विचार न पाहता हा उपक्रम सर्व चालकांसाठी खुला असेल. सुरुवातीला महाराष्ट्रात हा प्रकल्प सुरू केला जाईल आणि त्यानंतर देशभर विस्तार करण्याचा मानस असल्याचे दरेकर यांनी सांगितले.
त्यांच्या मते, या उपक्रमाचा मुख्य उद्देश टॅक्सी चालकांना न्याय्य उत्पन्न, व्यवसायातील भागीदारी आणि खासगी अॅग्रिगेटर कंपन्यांकडून होणाऱ्या कथित शोषणापासून संरक्षण देणे हा आहे.
हेही वाचा