केंद्राचा मोठा निर्णय, डाॅ. आंबेडकर जयंती सार्वजनिक सुटी घोषित

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

भारतीय संविधानाचे शिल्पकार डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची येत्या १४ एप्रिल २०२१ रोजी १३० वी जयंती आहे. या जयंतीचं औचित्य साधून केंद्र सरकारने या दिवशी राष्ट्रीय सुटी घोषित केली आहे. मागील अनेक वर्षांपासून या दिवशी राष्ट्रीय सुटीची मागणी करण्यात येत होती.

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी दरवर्षी १४ एप्रिल रोजी महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये सार्वजनिक सुटी असते. मात्र केंद्र सरकारने परिपत्रक काढून देशभरात ही सुटी लागू करण्याचे निर्देश दिले आहेत. कामगार, सार्वजनिक तक्रारी आणि पेन्शन मंत्रालयाने या सुटीसंदर्भात परिपत्रक जारी केलं आहे. निगोशिएबल इन्स्ट्रूमेंट्स अॅक्ट, १८८१, च्या कलम २५ अधिकारानुसार हा निर्णय घेण्यात आल्याचं मंत्रालयाने म्हटलं आहे. 

त्यानुसार या वर्षापासून १४ एप्रिल रोजी सर्व सरकारी कार्यालयांसोबतच औद्योगिक आस्थापनांमध्ये सार्वजनिक सुटी देण्यात येणार आहे.  

हेही वाचा- ठेवीदारांना दिलासा, पीपीएफ व्याजदरात कपातीचा आदेश चुकून निघाला

१४ एप्रिल १८९१ रोजी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला होता. स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजनीतिज्ञ, तत्त्वज्ञ, समाजसुधारक, पत्रकार, वकील, दलित बौद्ध चळवळीचे प्रेरणास्थान आणि भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक अशा अनेक अंगांनी डाॅ. आंबेडकरांना ओळखलं जातं.

आपल्या प्रचंड बुद्धिमत्तेच्या जोरावर डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी कष्टकरी, दलित समाजाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. स्वतंत्र मजूर पक्ष, दलित शिक्षण संस्थेची स्थापना, महिलांसाठी कार्य, स्वातंत्र्य लढ्यात सहभाग अशा कितीतरी गोष्टी बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवनात केल्या. समाजासाठी आपलं संपूर्ण आयुष्य खर्ची घातलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे हे कार्य राष्ट्रउभारणीसाठी खूप मोलाचं मानलं जातं. 

हेही वाचा- सुपरस्टार रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार

पुढील बातमी
इतर बातम्या