कामोठ्यातील सेक्टर 10 परिसरात बुधवारी सकाळी एक दुर्दैवी घटना घडली. झोपेत असताना घराच्या बेडरूमच्या छताचा आरसीसी स्लॅब कोसळल्याने 45 वर्षीय सुरेश लोखंडे यांचा मृत्यू झाला. तर त्यांची 12 वर्षीय मुलगी वेदिका जखमी झाली.
साय सिद्धी सोसायटीतील फ्लॅटमध्ये सुरेश लोखंडे आणि त्यांची मुलगी वेदिका बुधवारी सकाळी सुमारे 6 वाजण्याच्या सुमारास झोपलेले असताना बेडरूमच्या छताचा मोठा भाग अचानक कोसळला. स्लॅबचे अवजड काँक्रीट थेट दोघांवर पडल्याने ते ढिगाऱ्याखाली अडकले.
मोठा आवाज ऐकून कुटुंबीय आणि शेजारी तातडीने घटनास्थळी धावले. त्यांनी दोघांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी सुरेश लोखंडे यांना मृत घोषित केले. वेदिका हिच्यावर कामोठ्यातील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
2008 मध्ये बांधण्यात आलेली ही सहा मजली इमारत महापालिकेच्या धोकादायक इमारतींच्या यादीत नसल्याची माहिती समोर आली आहे. तरीही ही दुर्घटना नेमकी कशामुळे घडली, याचा शोध घेण्यासाठी प्रशासनाने इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत.
बांधकामातील त्रुटी, इमारतीची झीज किंवा देखभालीतील हलगर्जीपणा यापैकी कोणते कारण या दुर्घटनेला कारणीभूत ठरले, याची चौकशी सुरू आहे.
या घटनेमुळे मुंबई महानगर प्रदेशातील जुन्या निवासी इमारतींच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
हेही वाचा