नवी मुंबई मेट्रोचे उद्घाटन 30 ऑक्टोबरला होण्याची शक्यता

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

नवी मुंबईकरांची 12 वर्षांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. नवी मुंबई मेट्रोचे उद्घाटन ३० ऑक्टोबरला पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. याशिवाय, नमो महिला सक्षमीकरण अभियान देखील पंतप्रधानांच्या हस्ते या दिवशी सुरू करण्यात येणार आहे. 

नवी मुंबई मेट्रोचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एकाच महिन्यात होणारा तिसरा संभाव्य दौरा नवी मुंबईत आयोजित करण्यात आला आहे. नवी मुंबई मेट्रोच्या उद्घाटनासाठी 13, 14 आणि त्यानंतर 17 ऑक्टोबर ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली होती. 

परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्यस्त वेळापत्रकामुळे आजतागायत ही जुळवाजुळव होऊ शकली नाही. मात्र, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संभाव्य नवी मुंबई दौऱ्याचे ३० ऑक्टोबर रोजी नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार राज्य सरकार तसेच नवी मुंबईतील विविध शासकीय अधिकाऱ्यांनी पंतप्रधान मोदींच्या संभाव्य दौऱ्याची तयारी सुरू केली आहे. 

नवी मुंबई मेट्रोच्या उद्घाटनाच्या दिवशीच नमो महिला सक्षमीकरण अभियानाचा शुभारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. 

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या ठिकाणी नमो महिला सक्षमीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित महिलांना संबोधित करणार आहेत. या महिला मेळाव्यात राज्यभरातून विविध महिला बचत गटांतील १ लाखाहून अधिक महिला सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे सरकारी यंत्रणा रात्रंदिवस मेहनत घेत आहेत.


हेही वाचा

गोखले पूलाचा महुर्त पुन्हा टळला, आता 'या' तारखेला होणार उद्घाटन

पुढील बातमी
इतर बातम्या