नवी मुंबईत महिन्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत ५० टक्के वाढ

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

नवी मुंबई महापालिका क्षेत्रात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. मागील एका महिन्यात येथील कोरोना रुग्णांच्या संख्येत ५० टक्क्यांनी वाढ झाली आहे. नवी मुंबईतील वाढती रुग्णवाढ चिंतेचा विषय बनली आहे. 

पालिकेच्या आकडेवारीनुसार, एका महिन्यात नवी मुंबई महापालिका क्षेत्रात ११ हजार कोरोना रुग्ण आढळले आहेत.  २० ऑगस्ट रोजी नवी मुंबईत एकूण २२,२७५ पॉझिटिव्ह रुग्ण होते.  २० सप्टेंबरपर्यंत येथील रुग्णांची संख्या ३३,१४६  वर पोचली आहे. रुग्णांच्या संख्येत ५० टक्क्यांनी वाढ झाली आहे. नवी मुंबईत रोज नवीन ३५०-४०० रुग्ण वाढत आहेत. गणपती उत्सवानंतर कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याची दिसून येत आहे. 

एका महिन्यात पालिका क्षेत्रात १७२ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  मृ्त्यू दर कमी झाल्याचं दिसून येत आहे. २० ऑगस्ट रोजी मृत्यूदर २.३५ टक्के होता. तर २० सप्टेंबरपर्यंत मृ्त्यू दर २.१ टक्क्यांवर आला आहे. आतापर्यंत ७०३ रूग्णांनी आपला जीव गमावला आहे.

नवी मुंबईत सध्या ३५४३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात ३१ ते ४० वयोगटातील रुग्ण सर्वाधिक आहेत. तर कोरोनामुक्तीचा दर सुधारला असून महिनाभरापूर्वी दर हा ८० टक्के होता. तो आता ८७ टक्के झाला आहे.


हेही वाचा -

मुंबईत तब्बल 'इतक्या' इमारती टाळेबंद प्रतिबंधित

प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी 'बेस्ट घेणार 'एसटी'ची मदत


पुढील बातमी
इतर बातम्या