कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून ३ कोटींचा दंड वसूल

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी निर्बंधांचे पालन करण्याबाबत व्यापक स्वरुपात नवी मुंबई महापालिकेकडून जनजागृती करण्यात येत आहे. मात्र, अनेक नागरीक नियमांचं उल्लंघन करत असल्याचं आढळून आलं आहे. अशा नागरिकांवर तसंच आस्थापनांवर पालिकेकडून दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.

विभाग कार्यालय स्तरावर कार्यरत दक्षता पथकांप्रमाणेच प्रत्येक पथकात ५ कर्मचा-यांचा समावेश असलेल्या ३१ विशेष दक्षता पथकांकडून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिक आणि आस्थापना यांच्याकडून दंड वसूल करण्यात येत आहे. 

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ५ जून ते ४ जुलै २०२१ या एका महिन्याच्या कालावधीत ४३१२ नागरिक आणि आस्थापना यांच्यावर प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईतून २१ लाख ३० हजार ५५० रुपयांचा दंड वसूल केला आहे. आतापर्यंत ६५९३७ नागरिक आणि आस्थापना यांच्यावर कारवाई करत ३ कोटी २ लाख ८० हजार ६५० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव मागील आठवड्यापासून काहीसा स्थिरावलेला दिसत असून नवी मुंबई महानगरपालिकेने दैनंदिन टेस्टींगची संख्या कमी न करता ६००० पेक्षा अधिक ठेवली आहे. तसंच संभाव्य तिस-या लाटेला सामोरे जाण्यासाठी पूर्वतयारीही गतीमानतेने सुरु केलेली आहे. लस उपलब्धतेनुसार जास्तीत जास्त प्रमाणात लसीकरण व्हावे याकडेही लक्ष देत लसीकरण केंद्रांमध्ये वाढ करण्यात आलेली आहे. 

याशिवाय विविध सेवा पुरविताना संभाव्य जोखमीच्या व्यक्तींच्या  लसीकरणाकडेही विशेष लक्ष दिले जात आहे. त्याचप्रमाणे कॉरी क्षेत्रातील मजूर, रेडलाईट एरिआ, बेघर निराधार अशा दुर्लक्षित घटकांचेही लसीकरण करून घेतले जात आहे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात आत्तापर्यंत ५ लाख ७० हजाराहून अधिक नागरिकांचे लसीकरण पूर्ण झालेले आहे.



हेही वाचा -

महानायक हरपला, दिग्गज अभिनेते दिलीपकुमार यांचं निधन

  1. महाराष्ट्रात 'इथं' साकारलं जातंय छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्यदिव्य मंदिर
पुढील बातमी
इतर बातम्या