लाेणावळ्यात प्रवेशासाठी ई-पासची अट रद्द!

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

काही दिवसांपूर्वीच पर्यटकांविषयी कडक भूमिका घेणाऱ्या स्थानिक प्रशासनाने नरमाईचं धोरण स्वीकारत लोणावळ्यात पर्यटकांना ई-पास शिवाय येण्यास मंजुरी दिली आहे. प्रशासनाच्या या धोरणामुळे परिसरातील हाॅटेल व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

पावसाचा जाेर कमी झाल्यामुळे सध्या हिरवाईने नटलेल्या लोणावळा-खंडाळा परिसरात पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रवाशांचा ओघ वाढला आहे. लोणावळा परिसरातील नद्या-नाले, धरणं तुडूंब भरून वाहू लागले आहेत. जिकडे नजर टाकाल तिकडे सर्वत्र हिरवाई आणि जोडीला पांढरे शुभ्र फेसाळते झरे नजरेस पडत आहेत. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे या वर्षीही हौशी पर्यटकांची पावलं निसर्गरम्य ठिकाणांकडे वळू लागली आहेत. काेरोनाच्या संकटामुळे यावर्षी पर्यटकांची संख्या रोडावली असली, तरी उत्साह मात्र कायम आहे. 

असं असलं तरी काही दिवसांपूर्वी स्थानिक प्रशासनाने नद्या, धबधबे, धरणांवर पर्यटनासाठी येणाऱ्यांवर बंदी घातली होती. काही पर्यटक नियमांची पायमल्ली करत भुशी डॅम परिसरात दाखल झाले होते. अशा ३०० हून अधिक पर्यटकांवर लोणावळा पोलिसांनी खटले दाखल केले होते. या पर्यटकांना मावळ न्यायालयाने साडेतीन लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. पर्यटकांना रोखण्यासाठी पोलिसांनी खंडाळा, खालापूर टोल नाक्यासह नवसेना बाग, राईवूड चौकी याठिकाणी तपासणी नाके देखील उभारले होते. 

हेही वाचा - लोणावळ्याला जायचंय? पोलीस काय म्हणताहेत, वाचा…

तसंच लाॅकडाऊनच्या नियमानुसार लोणावळ्यात येताना ई-पास आवश्यक असल्याने पर्यटकांची संख्या कमी झाल्याचं स्थानिक हाॅटेल व्यावसायिकांना वाटत होतं. त्यामुळे हाॅटेल अँड रेस्टाॅरंट्स असोसिएशन आॅफ लोणावळा अँड खंडाळा (HRALK) तर्फे ई-पासची अट रद्द करण्याची मागणी केली जात होती. 

राज्य सरकारने मिशन बिगीन अगेन अंतर्गत १ आॅगस्टपासून केंद्र सरकारच्या कोरोनासंदर्भातील मागदर्शक तत्वे आणि अटी-शर्थींचं पालन करून एकूण क्षमतेच्या ३३ टक्के रूम बुकींग करण्यास हाॅटेल व्यावसायिकांना परवानगी दिली आहे. परंतु एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवेश करताना ई-पास आवश्यक असल्याने बहुतांश पर्यटक इच्छा असूनही पर्यटासाठी बाहेर पडेनासे झाले आहेत. परिणामी हाॅटेल सुरू करुन देखील म्हणावे त्या संख्येत पर्यटकच नसल्याने व्यवसाय होत नसल्याचं हाॅटेल चालकांचं म्हणणं होतं. 

हाॅटेल आणि रेस्टाॅरंट चालकांची ही मागणी लक्षात घेऊन स्थानिक प्रशासनाने ई-पासची अट रद्द करत ई-पास शिवाय लोणावळ्या प्रवेश करण्यास परवानगी दिली आहे. प्रशासनाच्या या निर्णयामुळे पर्यटनवाढीस चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा - गुड न्यूज ! राज्यात आता वाहतुकीसाठी ई-पासची गरज नाही

पुढील बातमी
इतर बातम्या