दुकानांवर मराठी पाट्या लावाच! पालिकेची 3000 दुकानांना नोटीस

Representative Image
Representative Image
  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबई महापालिकेने मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानदारांविरोधात कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. पालिकेने 87 हजार 47 दुकानांची तपासणी केली असता 3,040 दुकानदारांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. 2,116 जणांना न्यायालयात खेचण्यात आले आहे.

मराठी पाट्या दुकानाच्या प्रवेशद्वारावर ठळकपणे दिसतील अशा लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मार्च 2022ला दुकाने-आस्थापनांवरील नामफलक मराठी भाषेत आणि ठळकपणे लिहिण्याचा निर्णय घेण्यात आला. याआधी 2018च्या निर्णयानुसार 10 किंवा 10 पेक्षा जास्त कामगार अससेल्या दुकानांवर मराठी पाट्या असणे बंधनकारक होत्या.

मात्र नव्या नियमानुसार कर्मचाऱ्यांची संख्या कितीही असली तरी फलक मराठी भाषेतच असणे बंधनकारक करण्यात आले आहे. यानुसार दुकाने किंवा आस्थापनांवरील पाट्या मराठीत लावण्यासाठी देण्यात आलेली अखेरची मुदत 25 नोव्हेंबर 2023 रोजी संपल्यानंतर पालिकेच्या दुकाने-आस्थापने विभागाकडून कारवाई सुरू करण्यात आली आहे. यामध्ये सर्व २४ वॉर्डमध्ये दोन अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या पथकाकडून कारवाई करण्यात येत आहे.

मुंबईत सुमारे सात लाख दुकाने-आस्थापने आहेत. या सर्वांना हा नियम पाळणे बंधनकारक राहणार आहे. पालिकेच्या तपासणीत मराठी पाटी नसल्यास कारवाई करण्यात येईल.

पालिकेने आतापर्यंत केलेल्या कारवाईत 30 लाख 37 हजार 500 रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला आहे. कोर्टाच्या निर्देशांमुळे ही कारवाई अशीच सुरू राहणार आहे.

मराठी पाटी नसल्यास कायद्यानुसार प्रति कामगार दोन हजार याप्रमाणे जास्तीत जास्त एक लाखापर्यंतचा दंड होणार आहे, तर वारंवार दुर्लक्ष करणाऱ्यांकडून प्रतिदिन दोन हजार रुपये दंड वसूल केला जाणार आहे.


हेही वाचा

मुंबई विमानतळावरील फ्लाईट्सना विलंब का होतो?

उलवे : सिडको बामणडोंगरी गृहसंकुलात 243 दुकाने विक्रीसाठी उपलब्ध

पुढील बातमी
इतर बातम्या