मुंबईत आता फक्त ४१ प्रतिबंधित क्षेत्रे

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईत (mumbai) आता कोरोनाचा (coronavirus) संसर्ग नियंत्रणात येत असल्याचं दिसून येत आहे. मुंबईतील दैनंदिन कोरोना रुग्णांची संख्या घटत आहे. त्यामुळे प्रतिबंधित क्षेत्रांची (containment zone) संख्याही कमी झाली आहे. झोपडपट्ट्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे  प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या वाढली होती. मात्र, आता झोपडपट्टीतील कोरोनाचा फैलाव आटोक्यात आली आहे. 

कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव असलेल्या परिसर प्रतिबंधित क्षेत्र (containment zone) म्हणून घोषित करण्यात येतो. सध्या मुंबईत फक्त ४१ प्रतिबंधित क्षेत्रे आहेत. यामध्ये ५५ हजार घरे असून या घरांमध्ये २ लाख ५३ हजार नागरिक राहत आहेत. सर्वाधिक १२ प्रतिबंधित क्षेत्रे कांदिवली परिसरात आहेत. एप्रिलपासून मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली होती. त्यामुळे प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या २ हजार ८०० वर पोहचली होती.

मागील महिनाभरापासून झोपडपट्ट्या वदाटीवाटीच्या वस्तीमधील कोरोना रुग्णांची संख्या मोठी घटली आहे. त्यामुळे प्रतिबंधित क्षेत्रांची संख्याही कमी झाली आहे. सध्या पालिकेच्या कांदिवली आर दक्षिण विभागात सर्वाधिक १२ प्रतिबंधित क्षेत्रे आहेत. अंधेरी के पूर्व विभागात ८, ई विभाग भायखळा ५, भांडुप एस विभाग ४ तर चेंबूर एम पश्चिम विभागात ३ प्रतिबंधित क्षेत्रे शिल्लक आहेत.

प्रभादेवी,  दादर,  वरळी, धारावी येथे एकही प्रतिबंधित क्षेत्र नाही.  मुंबईतील पालिकेचे ११ विभाग प्रतिबंधित क्षेत्रमुक्त झाले आहेत. यामध्ये दक्षिण मुंबईसह मध्य मुंबई, अंधेरी पश्चिम, गोरेगाव, मालाड व बोरीवली विभागांचा समावेश आहे.

मुंबईत रविवारी १०६६ नवे रुग्ण आढळले. तर १३२७ रुग्ण बरे होऊन घरी परतले. मुंबईत सध्या एकूण सक्रिय रुग्ण २७३२२ आहेत. तर रुग्ण दुप्पटीचा कालावधी ४१४ दिवसांवर गेला आहे. 



हेही वाचा -

राज्यात १५ जूनपर्यंत लॉकडाऊन वाढला; पाहा काय बंद काय सुरू?

कोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी गावकऱ्यांनी पुढे यावे- मुख्यमंत्री

पुढील बातमी
इतर बातम्या