पालघरच्या आश्रमशाळेत 7 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू; 30 विद्यार्थी आजारी

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

पालघरच्या मासवण येथील अनुदानित आश्रमशाळेत सात वर्षीय इयत्ता पहिलीतील विद्यार्थी श्रेयस शैलेश आंबट याच्या मृत्यूनंतर प्रशासनाने व्यापक आरोग्य तपासणी मोहीम सुरू केली आहे.

शाळेतील काही विद्यार्थ्यांना ताप, सर्दी आणि खोकल्याची लक्षणे आढळून आल्याने त्यांच्या आरोग्यावर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. त्याचबरोबर शाळेतील स्वच्छता, पिण्याचे पाणी, अन्न आणि वैद्यकीय सुविधांचीही तपासणी केली जात आहे.

22 ऑगस्ट रोजी श्रेयसला तीव्र ताप आला होता. त्याला सुरुवातीला स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र, पुन्हा ताप आल्यानंतर त्याची प्रकृती बिघडली.

ऑक्सिजनची पातळी कमी झाल्याने त्याला मनोर ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. श्रेयसच्या मृत्यूचे नेमके कारण वैद्यकीय आणि शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे.

30 विद्यार्थी वैद्यकीय निरीक्षणाखाली

या आश्रमशाळेत एकूण 449 विद्यार्थी असून, त्यापैकी 395 विद्यार्थी निवासी आहेत. घटनेनंतर ताप, सर्दी आणि खोकल्याची लक्षणे असलेल्या 30 विद्यार्थ्यांना पालघर जिल्ह्यातील विविध आरोग्य केंद्रांमध्ये वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.

यापैकी 24 विद्यार्थ्यांवर मासवण प्राथमिक आरोग्य केंद्रात, पाच विद्यार्थ्यांवर मनोर ग्रामीण रुग्णालयात आणि एका विद्यार्थ्यावर पालघर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.

वैद्यकीय पथकांनी शाळेत जाऊन विद्यार्थ्यांची तपासणी केली असून रक्त आणि सीरमचे नमुने, घशातील स्वॅब तसेच इतर नमुने घेण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना झालेला ताप संसर्गजन्य आजारामुळे आहे का, याचा शोध घेण्यासाठी हे नमुने पुणे तसेच डहाणू येथील MRHRU प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.

शाळेच्या परिसरातील पाण्याचे नमुनेही तपासणीसाठी घेण्यात आले आहेत.

वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून शाळेची पाहणी

घटनेनंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पथकाने आश्रमशाळेला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. या पथकात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रणदिवे, ITDP प्रकल्प अधिकारी विशाल खत्री, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रामदास मराड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष चौधरी आणि अतिरिक्त आदिवासी आयुक्त गोपिचंद कदम यांचा समावेश होता.

अधिकाऱ्यांनी शाळेतील स्वच्छता आणि आरोग्य व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच विद्यार्थ्यांना तातडीने वैद्यकीय मदत मिळण्याची यंत्रणा तपासली. खबरदारीचा उपाय म्हणून परिसराची स्वच्छता आणि पाणी शुद्धीकरणाची कामेही सुरू करण्यात आली आहेत.

प्रयोगशाळेचे अहवाल आल्यानंतर पुढील वैद्यकीय उपाययोजना निश्चित केल्या जाणार आहेत.

मुख्याध्यापकांसह तीन जण निलंबित

या प्रकरणाच्या चौकशीदरम्यान शाळेचे मुख्याध्यापक राहुल सांख्ये, अधीक्षक अमृता सावंत आणि पांडुरंग लहारे यांना निलंबित करण्यात आले आहे.

यापूर्वी अन्न आणि औषध प्रशासनाच्या पथकाने शाळेतील स्वयंपाकघराची तपासणी केली होती. तसेच किराणा साहित्याचे नमुने घेऊन ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

विद्यार्थ्याचा मृत्यू, इतर विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या तक्रारी तसेच शाळेच्या एकूण व्यवस्थापनामध्ये काही त्रुटी किंवा हलगर्जीपणा झाला आहे का, याची चौकशी प्रशासनाकडून केली जात आहे.

चौकशीसाठी चार सदस्यीय SIT

या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी ठाणे येथील अतिरिक्त आदिवासी विकास आयुक्तांनी चार सदस्यीय विशेष तपास पथक अर्थात SIT स्थापन केले आहे.

ITDP जव्हारच्या प्रकल्प अधिकारी अपूर्वा बसूर या पथकाच्या प्रमुख आहेत. पालघरच्या सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत साळुंखे आणि आदिवासी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता राहुल देवरे हे सदस्य आहेत. तर ITDP जव्हारचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी दीपक टिके हे सदस्य सचिव आहेत.

श्रेयसच्या मृत्यूची परिस्थिती, विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या तक्रारी, शाळेतील स्वच्छता आणि इतर मूलभूत सुविधा तसेच शाळेच्या कारभारातील संभाव्य अनियमितता यांची चौकशी SIT करणार आहे. त्यानंतर अहवाल अतिरिक्त आदिवासी विकास आयुक्तांकडे सादर केला जाणार आहे.

आश्रमशाळा सरकारने ताब्यात घेण्याची मागणी

या घटनेनंतर आश्रमशाळांच्या व्यवस्थापनावर अधिक कठोर सरकारी नियंत्रण असावे, अशी मागणीही जोर धरू लागली आहे.

श्रमजीवी संघटनेच्या अध्यक्षा सीता घाटाळ यांनी शाळेला भेट देऊन महाराष्ट्र सरकारने या आश्रमशाळेचे व्यवस्थापन ताब्यात घ्यावे आणि ती पूर्णपणे सरकारी पद्धतीने चालवावी, अशी मागणी केली.

ही शाळा प्रामुख्याने कातकरी समाजातील तसेच डहाणू आणि परिसरातील स्थलांतरित आदिवासी कुटुंबांतील मुलांसाठी आहे. विद्यार्थ्यांना आपत्कालीन वैद्यकीय सुविधा, सुरक्षित पिण्याचे पाणी, पौष्टिक आहार आणि चांगल्या शैक्षणिक सुविधा मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले.

काही आठवड्यांपूर्वी गडचिरोलीतील निवासी आश्रमशाळेच्या वसतिगृहात सर्पदंशानंतर तीन आदिवासी मुलींचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर आता पालघरमधील या घटनेमुळे राज्यातील निवासी आदिवासी आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या आरोग्य आणि सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

सध्या आरोग्य विभाग, आदिवासी विकास विभाग आणि इतर यंत्रणा समन्वयाने काम करत असून, प्रयोगशाळेचे अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे. मात्र, सात वर्षांच्या श्रेयसचा मृत्यू नेमका कशामुळे झाला आणि इतर विद्यार्थ्यांना ताप येण्यामागचे कारण काय, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.


हेही वाचा

महाराष्ट्र सरकारकडून वृद्धाश्रमांसाठी अतिरिक्त एफएसआय जाहीर

पुढील बातमी
इतर बातम्या