केमिकल कंपनीत भीषण आग, १७ कर्मचाऱ्यांचा मृत्यू

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

पुण्याच्या पिरंगुट MIDC परीसरात एका केमिकल बनवणाऱ्या कारखान्यात भीषण आग (Fire) लागली. या आगीत १३ महिलांसह १७ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.

या घटनेवेळी कारखान्यात ३७ कर्मचारी काम करत होते. यामधून २० जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं. तर १ जण अद्यापही बेपत्ता आहे. जेसीबीच्या साहाय्यानं भिंत फोडून २० कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं. पिरंगुट एमआयडीसी मधील उरवडे गावच्या हद्दीत ही घटना घडली आहे. 

अचानक लागलेल्या आगीमुळे कंपनीत अनेक मजूर अडकून पडले होते. यामधून १७ जणांचा मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. भीषण आगीत होरपळून मृत्यू झाल्यानं मृतदेहांची ओळख पटवणं अवघड झालं आहे.

दरम्यान, वॉटर प्युरिफायरसाठी लागणारं केमिकल तयार करणाऱ्या कंपनीला ही भीषण आग लागल्याची माहिती आहे. या कंपनीमध्ये जवळपास ३७ मजूर काम करत होते. त्यापैकी १७ मजूर मृत्यूमुखी पडले आहेत. इतर २० जणांना वाचवण्यात यश आलं असून त्यांच्यापैकी काही जखमींवर उपचार सुरू आहेत.

अग्निशमन दलाचे ८ बंब घटनास्थळी दाखल झाले. त्याद्वारे आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. कंपनीत अडकलेल्या मजुरांची सुटका करण्यासाटी JCB च्या साह्यानं भिंती फोडून त्यांना बाहेर काढण्याचाही प्रयत्न करण्यात आला.

या कंपनीमध्ये लागलेल्या आगीच्या कारणाचा शोध घेतला जात आहे. पॅकिंगसाठी वापरण्यात येणाऱ्या प्लास्टीकमुळं आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.  


हेही वाचा

मुंबईत सलून, ब्युटी पार्लरमध्ये एसी सुरु ठेवल्यास कारवाई; महापौरांचा इशारा

वांद्र्यातील इमारतीचा स्लॅब कोसळला; एकाचा जागीच मृत्यू

पुढील बातमी
इतर बातम्या