खूशखबर! महापालिकेत २९१ दुय्यम अभियंत्याच्या जागा भरणार

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबई महापालिकेत लवकरच २९१ दुय्यम अभियंत्यांची भरती करण्यात येणार आहे. यासंबंधीची जाहिरात महिन्याभरात निघण्याची शक्यता असून सिव्हील, मॅकेनिकल, वास्तुशास्त्रज्ञ आणि इलेक्ट्रीकल या पदासाठी ही भरती असणार आहे.

आॅनलाईन प्रक्रिया 

पालिकेकडून काही महिन्यांपूर्वीच १३८८ कामगारांची भरती करण्यात आली होती. या भरतीला चांगला प्रतिसाद मिळाला होता आणि लाखोंच्या संख्येनं अर्ज सादर झाले होते. तर त्याचवेळी या भरतीच्या परिक्षेत विचारल्या गेलेल्या अवघड प्रश्नांमुळे भरतीची परिक्षाही चांगलीच गाजली होती. या भरतीनंतर आता महापालिकेनं २९१ दुय्यम अभियंत्यांच्या जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतला आहे. आॅनलाईन अर्ज मागवत भरती प्रक्रिया राबवण्याला पालिकेच्या स्थायी समितीनं याआधीच फेब्रुवारीमध्येच हिरवा कंदील दाखवला होता. पण प्रत्यक्षात अद्यापपर्यंत जाहिरातच प्रसिद्ध न झाल्यानं ही भरती प्रक्रिया रेंगाळली होती

आयुक्तांच्या सहीची प्रतिक्षा 

आता मात्र ही भरती प्रक्रिया मार्गी लागणार आहे. कारण या भरती प्रक्रियेच्या जाहिरातीचा प्रस्ताव पालिका आयुक्तांकडे सादर करण्यात आला आहे. आता केवळ आयुक्तांच्या सहीची प्रतिक्षा आहे. त्यानुसार आयुक्तांची सही झाल्यास महिन्याभरात या भरतीसाठी जाहिरात काढण्यात येण्याची शक्यता दाट झाली आहे. 

आयबीपीएसमार्फत भरती

२९१ दुय्यम अभियंता पदासाठी भरती होणार असून यातील १९० जागा या सिव्हीलसाठी, ९२ जागा मॅकेनिकल आणि विद्युतसाठी तर ९ जागा या वास्तुशास्त्रज्ञ पदासाठी असणार आहेत. दरम्यान पालिकेत अभियंता, दुय्यम अभियंत्यासारखी अनेक पदे रिक्त असून ही पदं भरली जात नसल्यानं सध्याच्या अभियंत्यांवर कामाचा भार पडत आहे. त्यामुळे ही भरती प्रक्रिया शक्य तितक्या लवकर मार्गी लावत रिक्त पदे भरावीत अशी मागणी होत होती. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन अर्थात आय.बी.पी.एस. या संस्थेच्या माध्यमातून भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. 


हेही वाचा - 

१२ ते २४ नोव्हेंबरदरम्यान पालिकेची टीबी नियंत्रणासाठी विशेष मोहीम


पुढील बातमी
इतर बातम्या