Advertisement

१२ ते २४ नोव्हेंबरदरम्यान पालिकेची टीबी नियंत्रणासाठी विशेष मोहीम

१२ ते २४ नोव्हेंबर दरम्यान पार पडणाऱ्या या विशेष मोहिमेसाठी आरोग्य विभागाकडून २९७ पथकं तयार करण्यात आली आहेत. या पथकात डाॅक्टरांसह अन्य कर्मचारी-अधिकाऱ्यांचा समावेश असून ही पथकं मुंबईतील घराघरात जाऊन तपासणी करणार आहेत.

१२ ते २४ नोव्हेंबरदरम्यान पालिकेची टीबी नियंत्रणासाठी विशेष मोहीम
SHARES

मुंबईत दिवसेंदिवस क्षयरोगाच्या (टीबी) रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळं या गंभीर आजाराला रोखण्याचं मोठं आव्हान मुंबई महानगर पालिकेच्या आरोग्य विभागासमोर उभं ठाकलं आहे. हे आव्हान पेलण्यासाठीच आरोग्य विभागानं मुंबईत टीबी नियंत्रणासाठी विशेष तपासणी मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. 


घरोघरी शोध

 अॅक्टीव्ह केस फाइंडींग नावानं राबवण्यात येणाऱ्या या मोहिमेला १२ नोव्हेंबरला सुरूवात होणार असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डाॅ. पद्मजा केसकर यांनी दिली आहे. तर ही मोहिम २४ नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार अाहे. या मोहिमेद्वारे घरोघरी जाऊन टीबीचे रूग्ण शोधून काढत त्यांना मोफत उपचार आणि समुपदेशन केलं जाणार आहे.


२९७ पथकं 

१२ ते २४ नोव्हेंबर दरम्यान पार पडणाऱ्या या विशेष मोहिमेसाठी आरोग्य विभागाकडून २९७ पथकं तयार करण्यात आली आहेत. या पथकात डाॅक्टरांसह अन्य कर्मचारी-अधिकाऱ्यांचा समावेश असून ही पथकं मुंबईतील घराघरात जाऊन तपासणी करणार आहेत. मुंबईतल्या ६५ परिसरातील ६० हजार घरांमधील सुमारे सात लाख लोकांच्या तपासणीचं उद्दीष्ट आरोग्य विभागानं ठेवलं आहे.

या तपासणीदरम्यान संशयित रूग्ण आढळल्यास नजीकच्या सरकारी प्रयोगशाळेत त्याच्या सर्व चाचण्या केल्या जाणार आहेत. तर त्याला विशेष व्हाऊचर देत त्याला खासगी केंद्रात मोफत चाचण्या आणि उपचार उपलब्ध करून दिले जाणार असल्याचंही डाॅ. केसकर यांनी सांगितलं आहे.


७ लाख तपासणीचं उद्दीष्ट

पालिकेच्या आरोग्य विभागाकडून नेहमीच जीवघेण्या अशा टीबीच्या आजारावर नियंत्रण आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात असून रूग्णांची तपासणी केली जाते. त्याअंतर्गत गेल्या वर्षी १ जानेवारी २०१७ ते मार्च २०१८ दरम्यान १ कोटी ७१ लाखांहून अधिक जणांची तपासणी करण्यात आली होती. तर आता या विशेष मोहिमेत सात लाख नागरिकांच्या तपासणीचं उद्दीष्ट आरोग्य विभागानं ठेवलं आहे. 


६५ परिसरांत मोहीम

मानखुर्द, गोवंडी, देवनार, शिवाजी नगर अशा भागात नेहमीच टीबीचा प्रार्दुभाव मोठ्या प्रमाणावर दिसतो. त्यामुळे या भागांसह ६५ परिसरांमध्ये टीबी नियंत्रणाची विशेष मोहिम राबवली जाणार आहे. त्यामुळे या मोहिमेला नागरिकांनी सहकार्य करावं, आपल्याकडे आलेल्या पथकाला योग्य प्रकारे माहिती द्यावी असं आवाहनही डाॅ. केसकर यांनी केलं आहे. हेही वाचा - 

डोंगरी बाल सुधारगृहातून तीन मुली पसार

ऐन दिवाळीत 'त्याचे' दिवाळे निघाले
संबंधित विषय