ऐन दिवाळीत 'त्याचे' दिवाळे निघाले


ऐन दिवाळीत 'त्याचे' दिवाळे निघाले
SHARES

दिवाळीच्या निमित्ताने ऑनलाईन शॉपिंग करताना सावधता बाळगली नाही तर ऐन दिवाळीतच तुमचे नक्कीच दिवाळे निघतील. त्यामुळेच अनोळखी ठिकाणी कार्ड स्वाईप करून खरेदी करताना सावधानता बाळगा, कारण तुमच्या बँक खात्यांची माहिती चोरून त्या खात्यावरील मोबाइल क्रमांक आणि ई-मेल आयडी बदलून चोरटे स्वतःच आॅनलाईन शाॅपिंग करू शकतात. कारण असाच प्रत्यय अंधेरीतल्या एका व्यावसायिकाला आला आहे.
अंधेरीतील एका व्यवसायिकाला सायबर चोरट्यांनी तब्बल ५ लाख ८३ हजारांना गंडवलं आहे. बँकेने व्यवसायिकाला क्रेडिट भरण्याबाबत पाठवलेल्या पत्रानंतर हा सर्व प्रकार पुढे आला. याप्रकरणी अंधेरी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.


संपूर्ण प्रकार

अंधेरी परिसरात राहणारे सुधीर साठे हे शहरातील नामकिंत कंपन्यांसाठी 'मॅनेजमेंट कन्सल्टंट'चं काम करतात. कंपनीच्या कामानिमित्त त्यांना वारंवार परदेशात जावं लागत असल्यामुळे त्यांच्याजवळ असलेल्या सिटी बँकच्या क्रेडिट कार्डद्वारे ते प्रवास खर्च भागवतात. त्या व्यतिरिक्त ते कार्ड कुठेही वापरत नाही. ५ लाख ८५ हजार रुपये त्यांच्या कार्डचं लिमिट आहे.

सोमवारी साठे त्यांच्या अंधेरी येथील घरी असताना त्यांना सिटी बॅकेतून क्रेडिट कार्डचे पैसे भरण्यासंदर्भात नोटीस आली. त्यावेळी खर्च केला नसताना पैसे भरण्याबाबत नोटीस का पाठवण्यात आली? याबाबत त्यांनी बँकेत चौकशी केली असता सप्टेंबर महिन्यात २७, २८, २९ आणि ३० तारखेला साठे यांच्या बनावट क्रे़डिट कार्डच्या मदतीने कुणी तरी अनोळखी व्यक्तीनेच तब्बल ५ लाख ८३ हजार रुपयांची खरेदी केल्याचं त्यांना कळालं.


पोलिसांत नोंदवली तक्रार

अधिक चौकशीत हुशार चोरट्यांनी साठे यांच्या खात्यावर असलेला मोबाइल आणि इमेल आयडी बदलला होता. त्यामुळे खरेदी केलेल्यानंतर खात्यातून वजा झालेल्या पैशांचा मेसेज किंवा मेल साठे यांच्यापर्यंत पोहचला नाही. त्यामुळे पैसे भरण्यासंदर्भात बँकेची नोटीस आल्यानंतर साठे यांना आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आलं. याप्रकरणी साठे यांनी अंधेरी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली असून पोलिस अधिक तपास करत असल्याचे 'मुंबई लाइव्ह' ला सांगितलं.


पोलिसांचं आवाहन

मुंबईत आतापर्यंत अशा प्रकारे फसवणुकीच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. अथॉटिकेशन पद्धतीपैकी एक असणाऱ्या वन टाईम पासवर्डने (ओटीपी) ऑनलाईन ट्राझँक्शनमार्फत दुसऱ्याच्या बँक अकाऊंटमधून सहजासहजी पैसे काढणाऱ्यांच्या विरोधात प्रभावी उपाय उपलब्ध नसल्याचं आता स्पष्ट झालं आहे. याबाबतीतील अनेक प्रकार समोर आले आहेत. ज्यामध्ये आरोपी चक्क बँक कस्टमर्सकडून चलाखीने ओटीपी घेऊन किंवा त्यांचा स्मार्टफोन हॅक करून ओटीपी प्राप्त करतात.

आता तर ते खरे अकाऊंट होल्डर सांगुन रजिस्टर फोन नंबरमध्ये बदल करत आहेत. एकदा नंबर बदलल्यानंतर ओटीपी त्या मोबाईलवर येण्यास सुरुवात होते आणि काही सेकंदात अकाऊंट रिकामी होतं. त्यामुळेच आॅनलाईन शाॅपिंग किंवा अनोळखी ठिकाणी कार्ड वापरताना काळजी घ्यावी, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा