'त्यां'चा जीव कधीही जाऊ शकतो! पण ऐकतोय कोण?

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईत जागेअभावी हजारो कुटुंबं टेकडीवर वास्तव्यास आहेत. मागील काही वर्षांपासून दर पावसाळ्यात दरडी कोसळण्याच्या घटना घडत असल्याने टेकड्यांवर अनधिकृतपणे राहणाऱ्यांना पावसाळ्यात घर खाली करण्याची नोटीस महापालिकेकडून बजावण्यात येते, तशीच नोटीस महापालिकेने चुनाभट्टी पूर्वेकडील कुरेशी हिल टेकडीवर राहणाऱ्या रहिवाशांना बजावली आहे. परंतु महापालिका राहण्यास पर्यायी जागा देत नसल्याने येथील रहिवाशांनी घरे खाली करण्यास ठाम नकार दिला आहे. टेकडीवर राहणाऱ्या रहिवाशांच्या या भूमिकेमुळे टेकडीखाली राहणाऱ्या रहिवाशांवर देखील पावसाळ्यात जीव मुठीत घेऊन राहण्याची वेळ आली आहे.

या आधीही कोसळली होती दरड..

चुनाभट्टीतील कुरेशी हिल टेकडीवर मागील 25 वर्षांपासून 20 हजारांहून अधिक रहिवासी रहात आहेत. तर टेकडीखालील मोहन नगरात अंदाजे 30 हजारांहून अधिक रहिवासी राहतात. दर पावसाळ्यात येथे दरड कोसळून अपघाताच्या घटना घडतात. 2016 साली या भागात दरड कोसळून टेकडीच्या पायथ्याशी राहणारे मोरे, शिंगाडे आणि गोरे या तीन कुटुंबीयांतील 6 सदस्य जखमी झाले होते, तर त्यातील एकाचा मृत्यू झाला होता.




महापालिका आणि जिल्हाधिकारी यांच्यात जागेवरुन वाद सुरू असल्याने येथे पुनर्विकास प्रकल्पाचे नावच निघत नाही. त्यामुळे मुसळधार पाऊस पडो किंवा चक्री वादळ येवो, महापालिका प्रशासन टेकडीवरील नागरिकांना पर्यायी जागा उपलब्ध करुन देत नाही. त्यामुळे नाईलाजाने आम्हाला मृत्यूशी झुंज देत येथेच राहावे लागत आहे.
- अब्दुल अहमद शेख, रहिवासी, कुरेशी हिल


रहिवाशांना हवीत पर्याय घरे..

सावधगिरीचा उपाय म्हणून टेकडीवर रहिवाशांना पावसाळा सुरु होण्यापूर्वी महापालिकेकडून घरे खाली करण्याची नोटीस बजावण्यात येते. पण घरे खाली करून जायचे तरी कुठे? असा प्रश्न येथील रहिवाशांसमोर उभा राहतो. महापालिका कायमस्वरुपी पर्यायी जागा देत नसल्याने कुणीही रहिवासी घर खाली करुन तात्पुरत्या निवाऱ्यांमध्ये जाण्याच्या भानगडीत पडत नाहीत. परिणामी टेकडीखाली राहणाऱ्या रहिवाशांच्या जीवाला असलेला धोकाही कायम राहतो.



पावसाळ्यात दरड कोसळून दुर्घटना होण्याची शक्यता गृहित धरून कुरेशी हिल टेकडीवर राहणाऱ्या रहिवाशांना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून घरे खाली करण्याची नोटीस बजावण्यात येते. परंतु रहिवासी या नोटिशीकडे दुर्लक्षच करताना दिसतात. यादरम्यान, येथील रहिवाशांची राहण्याची पर्यायी सोय महापालिका शाळांमध्ये करण्यात येते.
- संदेश मटकर, घनकचरा व्यवस्थापन अधिकारी, चुनाभट्टी चौकी 1, महापालिका 'एल' विभाग, कुर्ला

डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

पुढील बातमी
इतर बातम्या