महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) आणि परिवहन खात्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘रस्ता सुरक्षा अभियाना'च्या जनजागृती उपक्रमाला बळकटी देण्यासाठी प्रसिद्ध अभिनेते रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख यांची पुढील पाच वर्षांसाठी ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
या नियुक्तीचा करार हस्तांतरण सोहळा आज, 22 एप्रिल 2026 रोजी मंत्रालयात पार पडला. हा सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. मंत्रिमंडळ बैठकीनंतर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
रितेश जेनेलियाची काय असेल भूमिका?
एसटी महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध जनजागृती मोहिमांना अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचवणे, तसेच परिवहन खात्याच्या ‘रस्ता सुरक्षा अभियाना'ची जनजागृती अधिक परिणामकारक करण्याच्या उद्देशाने ही नियुक्ती करण्यात आली आहे.दरम्यान, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि रितेश देशमुख पत्रकारांशी संवाद साधत असताना मुंबईतील रिक्षा चालकांना मराठी सक्तीची करण्याच्या निर्णयाबाबत देखील प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी रितेश देशमुखने रिक्षाचालकांना मराठी सक्तीची करण्याच्या निर्णयाचे समर्थन केलं.मराठी मनोरंजन
आम्ही देखील लहान असताना साहेबांबरोबर एसटीचा प्रवास केला आहे असं सांगत रितेशने त्या प्रवासाच्या काही आठवणींना उजाळा देखील दिला. त्याबाबतचे फोटो आजही बाभळगावमध्ये आहेत. साहेब एसटीत बसले आहेत आणि बाहेरून तो फोटो काढलेला आहे. तो फोटो आमच्या परिवाराच्या अत्यंत जवळचा फोटो आहे असं देखील रितेश देशमुखनं सांगितलं.
हेही वाचा