
प्रवाशांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी बेस्ट उपक्रमाच्या परिवहन विभागाने 500 विनावातानुकूलित मिडी बसेस भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय घेतला आहे.
या बसेस मेट्रो, रेल्वे स्थानकासह टेकडीवर राहणाऱ्या प्रवाशांच्या सेवेत उपलब्ध करण्यात येणार आहे.
भाडेतत्त्वावरील बसेस न घेता स्वमालकीच्या बसेस घेण्यात याव्यात, अशी मागणी सत्ताधारी व विरोधकांनी लावून धरली आहे.
दरम्यान, बसेस भाडेतत्त्वावर घ्याव्यात की स्वमालकीच्या याचा प्रस्ताव राज्य सरकार व पालिका प्रशासनाकडे पाठवण्यात येईल.
तसेच यासाठी अनुदान मिळवण्याचा प्रयत्न करण्यात येईल, अशी माहिती बेस्ट उपक्रमाच्या महाव्यवस्थापक सोनिया सेठी यांनी दिली.
प्रवासी संख्यावाढीसह बेस्ट बसेसचा ताफा वाढीवर मंगळवारी झालेल्या बेस्ट समितीच्या बैठकीत चर्चा करण्यात झाली.
प्रवासी संख्या 25 लाखांहून अधिक असून प्रवाशांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी भाडेतत्त्वावरील 500 मिडी बसेस घेण्याबाबतची माहिती बेस्ट उपक्रमाने समितीच्या बैठकीत दिली.
या बस नऊ मीटर आकारातील सीएनजी नॉनएसी बस असतील. चालकांबरोबरच वाहकही असेल.
नवीन मिडी बस खरेदी करण्यासाठी बेस्ट उपक्रमाच्या वाहतूक विभागाने मेट्रो, रेल्वे स्थानक परिसरासह मुंबईतील टेकडी परिसरांचाही अभ्यास केला आणि तो मंगळवारी बेस्ट समितीच्या बैठकीत सादर करण्यात आला.
सध्या बेस्ट उपक्रमात 249 मालकीच्या बस असून यामध्ये 37 बस महिलांसाठीच्या तेजस्विनी मिडी बस आहेत, तर भाडेतत्त्वावरील 625 मिडी बस आहेत. विक्रोळी, भांडुप, पवई येथील टेकडीवरील परिसरात मिडी बस चालवण्यात येत होत्या.
हेही वाचा
