शिवस्मारकाच्या पायाभरणी ताफ्यातील बोटीला अपघात, १ जण बुडाल्याची भीती

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या कामाला बुधवारपासून सुरूवात करण्यात आली आहे. त्यानुसार पायाभरणीच्या कार्यक्रमासाठी समुद्रात निघालेल्या बोटीच्या ताफ्यातील एक स्पीड बोट दुपारी ४.४५ वाजेच्या दरम्यान खडकावर आपटून उलटली. या बोटीत २५ जण असून या बोटीतील लोकांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यापैकी सिद्धेश पवार हा शिवसंग्राम संघटनेचा कार्यकर्ता या दुर्घटनेत बेपत्ता असल्याची माहिती मिळत आहे. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बोटीत असल्याने बोट बुडाल्याचं म्हटलं जात आहे.

बचावकार्य सुरू

बचावकार्यासाठी घटनास्थळी २ हेलिकाॅप्टर आणि २ बोट दाखल झाली आहे. तर गेट वे आॅफ इंडिया आणि नरिमन पाॅईंट येथील जेट्टीवर अग्निशमन दलासह, तटरक्षक दलाचं पथक सज्ज  ठेवण्यात आलं आहे.  

कार्यक्रम रद्द

समुद्रात जिथं स्मारकाचं काम होणार आहे, त्या जागेवर भराव टाकण्याच्या कामाला ४.३० वाजेच्या दरम्यान सुरूवात करण्यात येणार होती. यासाठी एका छोटेखानी कार्यक्रमाचं आयोजन कंत्राटदाराकडून करण्यात आलं होतं. त्यासाठीच दुपारी या कार्यक्रमासाठी बोटी निघाल्या असता एक स्पीड बोट समुद्रातील खडकावर आपटली आणि बोटीला अपघात झाला. या अपघातानंतर पायाभरणीचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.

पायाभरणीच्या कार्यक्रमाला अधिकारी, एल अॅण्ड टीचे कर्मचारी, पत्रकार, शिवसंग्रामचे कार्यकर्ते निघाले असता ४.३०च्या सुमारास आमच्या ताफ्यातील एक बोट खडकावर आपटली. आपटल्याबरोबर बोट खालून फाटली आणि त्यात पाणी शिरायला सुरूवात झाली. पाणी शिरत असल्याचं लक्षात आल्याबरोबर त्या बोटीतील लोकांनी आमच्याशी संपर्क साधला, त्याबरोबर तटरक्षक दल आणि इतर यंत्रणांना कळवलं. तटरक्षक दलाच्या बोटीनं त्वरीत पोहचत बोटीतील सर्व जणांना सुखरूपपणे बोटीतून बाहेर काढलं. मात्र यादरम्यान एक जण बेपत्ता असून त्याला शोधण्याचं काम सुरू आहे.

- विनायक मेटे, अध्यक्ष, शिवस्मारक समिती


हेही वाचा-

शिवस्मारकासाठीची निविदा रद्द करा, प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करा-धनंजय मुंडे

शिव स्मारकाच्या प्रत्यक्ष बांधकामाला अखेर सुरुवात


पुढील बातमी
इतर बातम्या