Advertisement

शिवस्मारकासाठीची निविदा रद्द करा, प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करा-धनंजय मुंडे

शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र प्रसारमाध्यमांच्या हाती लागल्यानंतर एकच खळबळ उडाली. या वादात आता विरोधी पक्षानेही उडी घेत निविदा प्रक्रियेत भ्रष्टाचार झाल्याचा दावा केला आहे.

शिवस्मारकासाठीची निविदा रद्द करा, प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करा-धनंजय मुंडे
SHARES

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या प्रत्यक्ष बांधकामाला बुधवारी सुरूवात होते न होते तोच पुन्हा एकदा हा प्रकल्प वादात अडकला आहे. शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र प्रसारमाध्यमांच्या हाती लागल्यानंतर एकच खळबळ उडाली. या वादात आता विरोधी पक्षानेही उडी घेत निविदा प्रक्रियेत भ्रष्टाचार झाल्याचा दावा केला आहे. राष्ट्रवादीचे विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी या प्रकल्पाचं कंत्राट रद्द करण्याची मागणी करत या प्रकरणी न्यायालयीन चौकशीचीही मागणी केली आहे.


प्रत्यक्ष कामाला सुरूवात

अरबी समुद्रात १६.८६ हेक्टर जागेवर शिवस्मारक उभारण्याच्या प्रत्यक्ष कामाला बुधवारी, २४ आॅक्टोबरला सुरूवात करण्यात आली आहे. गेल्या ६ महिन्यांपासून रेंगाळलेल्या कामाला सुरूवात झाल्याने एकिकडे आनंद व्यक्त होत असताना मेटे यांच्या पत्राने या प्रकल्पाला पुन्हा वादात खेचलं आहे.




काय आहे पत्रात?

मेटे यांनी मुख्यमंत्र्यांना गेल्या महिन्यात एक पत्र लिहित या प्रकल्पासाठी काढण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेत आर्थिक देवाणघेवाण झाली असून ही निविदा प्रक्रियाच बेकायदेशीर असल्याचं नमूद केलं आहे. या प्रकरणाच्या चौकशीची मागणी करत संबंधित अधिकाऱ्यांवरही कारवाईचा बडगा उगारण्याची मागणी मेटे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केली होती.


सत्ताधाऱ्यांवर निशाणा

या पत्रानं आता चांगलीच खळबळ उडवून दिली असून याच पत्राच्या अनुषंगानं मुंडे यांनी आता सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला आहे. मेटे यांच्या पत्राने इतकी गंभीर बाब समोर आल्यानंतरही मुख्यमंत्र्यांनी त्याबाबत कोणतीही कारवाई केलेली नाही ही बाब धक्कादायक असल्याचं म्हणत मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांवरही टीका केली आहे.

छत्रपतींच्या स्मारकाच्या निविदा प्रक्रियेत भ्रष्टाचार करत ११ कोटी शिवप्रेमी जनतेचा अवमान केला जात असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. त्याचवेळी सध्याची निविदा-कंत्राट रद्द करत नव्यानं निविदा मागवण्याची मागणी करतानाच या प्रकरणाच्या न्यायालयीन चौकशीची मागणी त्यांनी केली आहे.



हेही वाचा-

शिव स्मारकाच्या प्रत्यक्ष बांधकामाला अखेर सुरुवात

शिवस्मारकाच्या कामाला २४ आॅक्टोबरचा मुहूर्त; खर्च ६४३ कोटींनी वाढला



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा