मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 9 ऑगस्ट रोजी पुकारण्यात आलेल्या बंदच्या पार्श्वभूमिवर राज्याचे मुख्य सचिव दिनेशकुमार जैन यांनी पोलिस, वाहतूक, रेल्वेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. बंदच्या पार्श्वभूमिवर कुठलाही अनुचीत प्रकार घडू नये याकरता यंत्रणांनी अधिक दक्षता घ्यावी, असे निर्देश यावेळी त्यांनी दिले.
मंत्रालयातील मुख्य सचिवांच्या दालनात ही बैठक पार पडली. या बैठकीत राज्यभरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या मुद्द्यावर चर्चा झाली. बंदच्या काळात संपूर्ण राज्यभरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस बंदोबस्त चोख ठेवण्याबरोबरच शहरांमधील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरळीत राहील यासाठी प्रयत्न करावे. एसटी बस सेवा त्याचबरोबर मुंबईत बेस्टची बस सेवा सुरळीत सुरू राहण्यासाठी पोलिसांनी आवश्यक ते सहकार्य करावे, असे निर्देश मुख्य सचिवांनी दिले.
याचबरोबर शाळा-महाविद्यालयांना आवश्यक ती सुरक्षा देताना या काळात असलेल्या परिक्षा व्यवस्थीत पार पडतील याची काळजी घ्यावी. बंद काळात रेल्वे सेवा सुरू राहील याची दक्षता रेल्वे सुरक्षा दलाने घ्यावी. सर्वच यंत्रणांनी परस्परांशी समन्वय ठेवून बंद काळात आवश्यक त्या सेवांवर परिणाम होणार नाही याची खबरदारी घ्यावी, असे मुख्य सचिव जैन यांनी सांगितलं.
या बैठकीला गृह विभागाचे अपर मुख्य सचिव सुनील पोरवाल, राज्याचे पोलिस महासंचालक दत्ता पडसलगीकर, परिवहन विभागाचे प्रधान सचिव आशिषकुमार सिंह, गृह विभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता, मुंबई पोलिस आयुक्त सुबोध कुमार जैसवाल यांच्यासह मुंबई महापालिका, बेस्ट, राज्य महामंडळ, रेल्वे, रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा -