आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आज गुरुवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील अनेक शाळांना गुरुवारी सुट्टी देण्यात आली आहे.
आरक्षणासाठी मराठा समाजाच्या संघटनांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली असली तरी मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यात ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान शिक्षण विभागाने अधिकृतपणे शाळा बंद करण्याच्या सूचना दिलेल्या नाहीत. मात्र या बंदच्या पार्श्वभूमीवर, खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय शाळा प्रशासनाने घेतला आहे.
महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यात ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. शिवाय हे आंदोलन शांततेत पार पडेल अशी माहिती बुधवारी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी दिली होती. मात्र मुंबईतील सांताक्रूझ, गोरेगाव, भांडुप, दादर, भायखळा या विभागातील काही शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन शाळांना सुट्टी देता येईल, असं जाहीर केलं होतं.
हेही वाचा -