मुंबईतील रुग्णवाढीनं रविवारी नवा उच्चांक गाठला

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईमधील रुग्णवाढीनं रविवारी नवा उच्चांक गाठला असून रविवारी तब्बल ११ हजार १६३ मुंबईकरांना कोरोनाची बाधा झाली. तर २५ रुग्णांचा मृत्यू झाला. मुंबईतील रुग्ण वाढीचा दर १.६१ टक्क्यांवर पोहोचला असून रुग्णदुपटीच्या कालावधीत कमालीची घसरण झाली आहे.

कोरोनाबाधित रुग्णांच्या शोधार्थ महापालिकेनं रविवारी ५१ हजारांहून अधिक चाचण्या केल्या. गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं कोरोनाबधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळं राज्य सरकार, महापालिका आणि अन्य यंत्रणांनी कोरोना संसर्गाविरोधात पुन्हा एकदा कंबर कसली आहे. रविवारी मुंबईतील ११ हजार १६३ जणांना बाधा झाल्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या चार लाख ५२ हजार ४४५ वर पोहोचली आहे.

विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेले १३ पुरुष आणि १२ महिलांचा रविवारी करोनामुळे मृत्यू झाला. यापैकी १८ जणांना दीर्घकालीन आजार होते. आतापर्यंत ११ हजार ७७६ मुंबईकरांना करोनामुळे प्राण गमवावे लागले आहेत.

विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेले तब्बल ५ हजार २६३ जण रविवारी कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ३ लाख ७१ हजार ६२८ वर पोहोचली आहे. आजघडीला विविध रुग्णालयांमध्ये ६८ हजार ०५२ रुग्ण उपचार घेत आहेत.

महापालिकेकडून दिवसभरात ५१,३१९ चाचण्या

करोनाबाधित रुग्णांचा शोध घेण्यासाठी पालिकेने रविवारी तब्बल ५१ हजार ३१९ चाचण्या केल्या असून त्यापैकी ११ हजार १६३ रुग्ण बाधित झाले आहेत. आतापर्यंत ४२ लाख ६९ हजार १७५ चाचण्या करण्यात आल्या  आहेत. मुंबईतील करोना दुप्पटीचा कालावधी ४२ दिवसांपर्यंत खाली आला आहे. तर रुग्ण कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण ८२ टक्क्यांवर घसरले आहे.

कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या अतिजोखमीच्या गटातील तब्बल ३० हजार १३९ संशयित रुग्णांचा शोध घेण्यात महापालिकेला यश आले आहे. यापैकी ९९० संशयित रुग्णांना संस्थात्मक विलगीकरण केंद्रात ठेवण्यात आले आहे.


हेही वाचा -

बापरे! अक्षय कुमारनंतर तब्बल ४५ सहकलाकारांना कोरोनाची लागण

Maharashtra Weekend Lockdown : काय सुरू काय बंद? जाणून घ्या!

पुढील बातमी
इतर बातम्या