आरे वृक्ष तोड प्रकरण : मुंबई मेट्रोला ठोठावला १० लाखांचा दंड

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईतल्या आरे कॉलनीतील वृक्ष तोड प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसंच न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन करून आणखी झाडं तोडल्याप्रकरणी मुंबई मेट्रोला १० लाखांचा दंड ठोठावला आहे.

“आम्ही तुम्हाला ८४ झाडं तोडण्याची संमती दिली होती. तरीही मेट्रो रेल कॉर्पोरेशनने वृक्ष प्राधिकरणाकडे जाऊन न्यायालयाचा अपमान केला,” असं म्हणत सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारलं आहे.

आरे कारशेडचा मुद्दा फडणवीस सरकारमध्ये चांगलाच गाजला होता. त्यानंतर महाविकास आघाडीने या कारशेडला स्थगिती दिली. तर राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर ही स्थगिती उठवण्यात आली होती.

सर्वोच्च न्यायालयाने हे देखील स्पष्ट केलं आहे की, दंडाची रक्कम मुख्य वन संरक्षकाकडे जमा केली जाईल. सर्वोच्च न्यायालयाने मुंबई मेट्रोच्या १५ मार्च २०२३ च्या वृक्ष प्राधिकरणाने दिलेल्या निर्णयाचं पालन करण्यासही सांगितलं आहे. तसंच कारशेडसाठी १७७ झाडांची कत्तल करण्यात आली असंही म्हटलं आहे.

सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती पी. एस. नरसिंहा आणि न्यायमूर्ती जे. बी. पारदीवाला यांच्या पीठाने हा निर्णय घेतला आहे. त्यांनी असंही म्हटलं आहे आम्ही मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिडेडला ८४ झाडं तोडण्याची संमती दिली होती. मात्र त्यांनी ८४ पेक्षा जास्त झाडं तोडली. त्यासाठी ते प्राधिकरणाकडे गेले होते जे चुकीचं आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.


हेही वाचा

मेट्रो ४ मार्गिकेचे आतापर्यंत ४९ टक्के काम पूर्ण

बोरिवली-ठाणे बोगद्याचे काम पावसाळ्यापर्यंत सुरू होणार

पुढील बातमी
इतर बातम्या