१६ जुलैपासून मुंबईत दूध'बाणी’!

  • मुंबई लाइव्ह टीम & मंगल हनवते
  • सिविक

मुंबईकरांच्या दिवसाची सुरूवात होते ती सकाळच्या गरमागरम चहानं. आणि चहा म्हटलं की दूध आलंच. पण १६ जुलैपासून मुंबईकरांवर कोरा, बिनदुधाचा चहा पिण्याची वेळ येण्याची शक्यता आहे. हो...कोरा, बिनदुधाचा चहा, कारण १६ जुलैपासून मुंबईकरांना दूधच मिळणार नाही.

हमीभावासाठी अांदोलन

राज्यातील दुध उत्पादकांना प्रतिलीटर २७ रुपये देण्याच्या राज्य सरकारच्या अध्यादेशाची अद्यापही अंमलबजावणी होताना दिसत नाही. त्यामुळे राज्यभरातील दूध उत्पादकांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. या आर्थिक नुकसानीला कंटाळलेल्या दूध उत्पादकांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यानुसार गेल्या कित्येक दिवसांपासून वेगवेगळ्या संघटनांच्या माध्यमातून दुधाला हमीभाव मिळावा यासाठी आंदोलन करण्यात येत आहे. मात्र त्यानंतरही सरकारला जाग येत नसल्यानं आता दूध उत्पादकांनी मुंबईकरांचं दूध रोखत आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे.

बेमुदत आंदोलन

१६ जुलैपासून स्वाभिमान शेतकरी संघटनेनं दुधाच्या हमीभावासाठी आंदोलन छेडलं आहे. १६ जुलैपासून मुंबईत एक थेंबही दूध येऊ दिलं जाणार नाही. मुंबईत ज्या तीन मार्गानं दूध येतं ते अहमदाबाद मुंबई मार्ग, नगर-नाशिक मार्ग आणि पुणे-मुंबई मार्ग रोखून धरणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी मुंबई लाइव्हशी बोलताना दिली.  हे आंदोलन बेमुदत अर्थात जोपर्यंत राज्य सरकार दूध उत्पादकाच्या खात्यात दिवसाला प्रत्येकी ५ रुपये अनुदान जमा करण्याचा निर्णय घेत नाही तोपर्यंत सुरू राहील असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

गुजरात-कर्नाटकचे दूध रोखणार 

या आंदोलनात लहान मुलांचे हाल होण्याचीही शक्यता आहे. कारण या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून गुजरात आणि कर्नाटकामधून दुध मागवण्यात येण्याची शक्यता असल्यानं गुजरात-कर्नाटक मार्गे येणारं दूधही रोखण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे १६ जुलैपासून मुंबईकरांना दूध मिळणे अवघड होण्याची शक्यता आहे.

५ रुपये अनुदानाची मागणी

शेट्टी यांच्या म्हणण्यानुसार राज्यात दररोज १ कोटी लिटर गाईच्या दुधाचं उत्पादन होतं. एक लीटर दुधाचा उत्पादन खर्च ३५ रुपये असताना दूध उत्पादकाच्या हातात फक्त १७ रुपये पडतात. त्यामुळे त्याला मोठं आर्थिक नुकसान सहन करावं लागतं. त्यातही हा दूध उत्पादक गरीब शेतमजूर आणि भूमीहीन शेतकरी असल्यानं हे आर्थिक नुकसान या दूध उत्पादकांना आणखी अडचणीत आणत आहे. त्यामुळे कर्नाटकाच्या धर्तीवर दुध उत्पादकांच्या खात्यात ५ रुपये अनुदान दिवसाला जमा करावं अशी मागणी शेट्टी यांची आहे. 

या मागणीसाठी राज्य सरकारकडं सातत्यानं पाठपुरावा करूनही काही होत नसल्यानं आता आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेत मुंबईकरांचं दूध रोखण्याचा निर्णय शेट्टी यांनी घेतला आहे


हेही वाचा- 

मुंबईकर पुन्हा गॅसवर, गॅसच्या किमती वाढल्या

मेट्रो-४ लाही वादाचं ग्रहण, घाटकोपरवासियांचा विरोध


पुढील बातमी
इतर बातम्या