Advertisement

मेट्रो-४ लाही वादाचं ग्रहण, घाटकोपरवासियांचा विरोध


मेट्रो-४ लाही वादाचं ग्रहण, घाटकोपरवासियांचा विरोध
SHARES

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) कडून मुंबईतील वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यासाठी मुंबईसह मुंबई महानगर प्रदेशात मेट्रोचं जाळं विणण्याचं काम करत आहे. तर दुसरीकडे या मेट्रो प्रकल्पांना काही ना काही कारणांनी नागरिकांकडून व पर्यावरण संस्थांकडून विरोध होत अाहे. त्यामुळे मेट्रो प्रकल्पांच्या कामात खोडा निर्माण होत आहे.

याआधी कुलाबा-वांद्रे-सिप्झ या मेट्रो-३ ला तर त्यानंतर दहिसर ते डी एन. नगर मेट्रो-२ ला स्थानिकांनी जोरदार विरोध केला असून मेट्रो-३ चा वाद तर थेट न्यायालयाच्या दारात गेला आहे.


मार्ग बदलण्याची मागणी

 आता एमएमआरडीएकडून नुकतंच बांधकामाला सुरूवात झालेल्या वडाळा-घाटकोपर-ठाणे-कासारवडवली या मेट्रो-४ लाही वादाचं ग्रहण लागलं आहे. मेट्रो-४ ला घाटकोपरमधील स्थानिकांनी जोरदार विरोध दर्शवला असून मेट्रो-४ चा मार्ग बदलण्याची मागणी उचलून धरली आहे. घाटकोपर पीपील्स फोरमच्या माध्यमातून या मागणीसाठी घाटकोपरवासीय एकवटले आहेत.मुंबई आणि ठाण्याला थेट एकमेकांशी जोडण्यासाठी एमएमआरडीएनं मेट्रो-४ प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पाच्या कामाला नुकतीच सुरूवात झाली असून सुरूवातीलाच हा प्रकल्प वादात सापडला आहे. 


९० फीट रोडवर मेट्रो नको

मेट्रो-४ चा अमर महल ते पंतनगर बस डेपो हा अंदाजे दीड किमीचा मार्ग बदला अशी घाटकोपर पीपल्स फोरमची मागणी असल्याची माहिती फोरमचे प्रमुख प्रविण छेडा यांनी मुंबई लाइव्हशी बोलताना दिली.  घाटकोपरमधील ९० फीट रोडवरून मेट्रो-४ जाणार असून हा या ठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी असते. अशा वेळी मेट्रोच्या कामासाठी पुढची काही वर्षे हा रस्ता बंद राहिला आणि या रस्त्यावर मेट्रो आली तर वाहतूक कोंडीचे तीन तेरा वाजतील असं म्हणत छेडा यांनी ९० फीट रोडवर मेट्रो-४ होऊ देणार नाही, असा इशारा दिला आहे.


ईस्टर्न एक्सप्रेसवरून नेण्याची मागणी

अमर महल ते पंतनगर बस डेपो असा मार्ग न करता अमर महलवरून ईस्टर्न एक्सप्रेस वेवरूनच पुढे न्यावा, अशी मागणीही फोरमने केली आहे. छेडा यांच्या म्हणण्यानुसार मेट्रो-४ च्या मुळ प्रस्तावानुसार अमर महलवरून थेट घाटकोपरला ईस्टर्न एक्सप्रेसवरूनच हा मार्ग जाणार होता. पण नंतर एमएमआरडीएने मुळ आराखड्यात बदल केला. ईस्टर्न एक्सप्रेसवरून मेट्रो-४ नेल्यास त्याचा फायदा एमएमआरडीएला होईल आणि घाटकोपरमधील रहिवाशांनाही होईल.  

कामराजनगर, पेस्तन सागर काॅलनी, रमाबाई काॅलनी आणि छोडानगर सारख्या परिसरात कोणतीही सक्षम सार्वजनिक वाहतूक सेवा अद्याप पोहचलेली नाही. त्यामुळे ईस्टर्न एक्सप्रेस वे वरून मेट्रो नेल्यास या चार परिसरातील रहिवाशांना मेट्रो-४ चा फायदा होईल, असंही छेडा यांनी स्पष्ट केलं आहे.  


न्यायालयात जाण्याचा इशारा

या मागणीसाठी रविवारी सकाळी ९ ते १२ या वेळेत फोरमच्या माध्यमातून घाटकोपर येथील ९० फीट रोड इथं धरण आंदोलन करण्यात आलं.  यावेळी मोठ्या संख्येने स्थानिक उपस्थित होते आणि त्यांनी कोणत्याही परिस्थित ९० फीट रोडवर मेट्रो-४ होऊ दिली जाणार नाही असा निर्धार व्यक्त केला. फोरमने आपल्या मागणीचं पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह एमएमआरडीए आयुक्तांना पाठवलं आहे. तर ही मागणी येत्या काही दिवसांत मान्य झाली नाही तर जनआंदोलन तीव्र करत दुसरीकडे या मागणीसाठी न्यायालयात धाव घेणार असल्याचंही छेडा यांनी सांगितलं आहे.



हेही वाचा -

शाळाचं देणार विद्यार्थ्यांचे गणवेश 

मुंबईकरांना पालिका देणार मोफत रोपटी


 

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा