ठाणे गावदेवी मार्केट आगप्रकरण: मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना 10 लाखाची मदत

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

ठाण्यातील गावदेवी मार्केट (Gaondevi Market) येथे लागलेल्या भीषण आगीत मृत्यूमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत आणि बाधित व्यापाऱ्यांसाठी दिलासादायक उपाययोजना जाहीर करण्यात आल्या आहेत.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या निर्देशानुसार झालेल्या तातडीच्या बैठकीत ठाणे पालिकेने Thane Municipal Corporation महत्त्वाचे निर्णय घेतले. आगीत मृत्यू झालेल्या दोन कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 10 लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे. जखमी कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 1 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे.

या बैठकीला महापालिका आयुक्त सौरभ राव, महापौर शर्मिका पिंपळेकर Sharmila Pimpalolkar, खासदार नरेश म्हस्के Naresh Mhaske आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

21 मे 2026 रोजी पहाटे ठाण्यातील नौपाडा परिसरातील गोखले रोडवरील गावदेवी भाजी मार्केटमध्ये भीषण आग लागली होती. पहाटे सुमारे 3:30 ते 3:45 च्या दरम्यान आग लागल्याची माहिती असून, काही वेळातच दोन मजली बाजार संकुलात आगीने विक्राळ रूप धारण केले. या आगीत जवळपास 155 दुकाने आणि स्टॉल जळून खाक झाले. प्राथमिक माहितीनुसार, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

बचावकार्यादरम्यान सुरक्षा रक्षक काळू गडेकर Kalu Gadekar आणि अग्निशमन दलातील जवान सागर शिंदे Sagar Shinde यांचा गुदमरून मृत्यू झाला. तसेच अनेक अग्निशमन कर्मचारी जखमी झाले आहेत.

सरकारने बाधित व्यापाऱ्यांना मदत करण्याचे आश्वासन दिले असून, महापालिकेकडून बाजारपेठेचे पुनर्वसन आणि पुनर्बांधणी लवकरात लवकर करण्याचे नियोजन सुरू करण्यात आले आहे.


हेही वाचा

महाराष्ट्रात यंदा रस्ते अपघातांमधील मृत्यूंमध्ये लक्षणीय घट

पुढील बातमी
इतर बातम्या