पाणी पुरवठा कर न भरलेल्यांवर ठाणे महापालिकेची कारवाई

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

ठाणे महापालिका अधिकाऱ्यांनी विशेष मोहीम राबवत १ हजार ३१३ नळ जोडण्या बंद करुन टाकल्या आहेत. यामध्ये पाणी बिलाची देयके न भरणारे आणि मागील थकबाकीदार यांचा समावेश आहे. यापुढे देखील अशीच कारवाई सुरू असणार असल्याचं पालिकेच्या वतीनं सांगण्यात आलं आहे.

कोरोना काळात प्रचंड पैसा खर्च झाला मात्र विविध सवलती दिल्यानं महापालिकेला कर स्वरुपात मिळणारा पैसा अतिशय कमी प्राप्त झाला. त्यामुळे आता कर वसुली करुन तिजोरी भरण्याचे काम महापालिका आयुक्तांनी सुरू केले आहेत.

महानगरपालिकेच्या वतीनं २०२०-२१ या आर्थिक वर्षातील मालमत्ता कर आणि पाणी देयकांची तसंच मागील थकबाकी वसुलीकरता विशेष मोहीम सुरू आहे. या मोहिमेअंतर्गत नळ संयोजन खंडित करुन पाणीपुरवठा बंद करणे, जप्तीची कारवाई करणे, पंप रुम सील करणे, पंप जप्तीची कारवाई करणं अशा प्रकारची मोहीम हाती घेण्यात आलेली आहे.

या मोहिमेंतर्गत २१ डिसेंबरला तब्बल १०७ नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या आणि त्यांचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला. तसंच आजपर्यंत एकूण १ हजार ३१४ नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या आहेत, अशी माहिती महापालिकेनं दिली आहे.

ही कारवाई टाळण्यासाठी नागरिकांनी त्यांची पाणी बिलांची देयके तातडीने भरुन महापालिकेला सहकार्य करावे आणि आपल्यावर होणारी कारवाई टाळावी, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.


हेही वाचा

कबुतरांना खायला घालण्यावर ठाणे महापालिकेची बंदी

मुंबई-ठाण्यात पोलिसांची संचारबंदी

पुढील बातमी
इतर बातम्या