राज्यात देशातील पहिले अंडरवॉटर म्युझियम

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (MTDC) मार्फत सिंधुदुर्ग (sindhudurg) जिल्ह्यातील निवती रॉक (nivati) परिसरात भारतीय नौदलाची सेवानिवृत्त युद्धनौका 'एक्स-आयएनएस गुलदार' समुद्रतळावर यशस्वीरित्या स्थापित करण्यात आली आहे.

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड यांच्या समन्वयाने राबविण्यात येणारा हा प्रकल्प भारतीय पर्यटन क्षेत्रासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरले आहे.

हा प्रकल्प जागतिक स्तरावर सागरी पर्यटन आकर्षण म्हणून उदयास येणार आहे, अशी माहिती पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.

या पर्यटन स्थळामध्ये मार्गदर्शित व्रेक डायव्हिंग व सबमरीन अनुभव, डिस्कव्हर स्कुबा डायव्हिंग (12 मीटरपर्यंत), प्रमाणित डायव्हर मोहिमा (18 मीटरपर्यंत), अॅडव्हान्स डायव्हिंग अनुभव (30 मीटरपर्यंत), अंडरवॉटर फोटोग्राफी पर्यटन, सागरी शिक्षण व संशोधन करता येणार आहे.

डायव्हिंग स्लॉट्स, सबमरीन बुकिंग आणि पर्यटक सुविधांबाबतची माहिती लवकरच एमटीडीसीच्या अधिकृत माध्यमांतून जाहीर करण्यात येईल, अशी माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाने या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला गती प्राप्त झाली आहे.

राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांचे सहकार्य, पर्यटन विभागाचे अपर मुख्य सचिव, संजय खंदारे आणि एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक नीलेश गटणे (भाप्रसे) यांच्या प्रयत्नांतून या प्रकल्पाची यशस्वी अंमलबजावणी करण्यात येत आहे.

हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पर्यटन मंत्रालय, भारत सरकारच्या जागतिक दर्जावर आयकॉनिक पर्यटन केंद्रांचा विकास भांडवली गुंतवणुकीसाठी राज्यांना विशेष सहाय्य (SASCI) या योजनेतंर्गत एमटीडीसी मार्फत विकसित करण्यात येत आहे.

या प्रकल्पासाठी केंद्र सरकारने 46.91 कोटी रुपये तर महाराष्ट्र (maharashtra) शासनाने 112.46 कोटी रुपये इतक्या रक्कमेस मंजुरी दिली आहे, अशी देखील माहिती शंभूराज देसाई यांनी दिली.

एक्स-आयएनएस गुलदार (INS guldaar) ही भारतीय नौदलातील 'मगर' वर्गातील लँडिंग शिप टँक प्रकारातील युद्धनौका आहे.

तसेच तिने तब्बल 39 वर्षे राष्ट्रसेवा बजावून 12 जानेवारी 2024 रोजी भारतीय नौदलामधून निवृत्त झाली. पोलंडमधील ग्डिनिया शिपयार्ड येथे 30 डिसेंबर 1985 रोजी नौकेचे उद्घाटन झाले होते.

83.9 मीटर लांबीची ही नौका उभयचर युद्ध कारवाई, सैनिक व रसद वाहतूक, किनारी सुरक्षा तसेच विविध नौदल सराव मोहिमांमध्ये कार्यरत होती.

या प्रकल्पामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यासह संपूर्ण कोकण किनारपट्टीतील पर्यटन अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे.

देश-विदेशातील पर्यटकांच्या वाढत्या आगमनामुळे स्थानिक व्यवसाय, निवास व्यवस्था, वाहतूक, खाद्यव्यवसाय आणि पर्यटन सेवांमध्ये आर्थिक उलाढाल वाढण्यास मदत होणार आहे.

दीर्घकालीन दृष्टीकोनातून हा प्रकल्प स्थानिक आर्थिक विकासासाठी व स्थानिक रोजगारासाठी, पूरक व्यवसायासाठी महत्त्वपूर्ण केंद्र ठरणार आहे.

एक्स-आयएनएस गुलदार प्रकल्पामुळे महाराष्ट्रात प्रथमच जागतिक दर्जाचा पाणबुडी पर्यटन अनुभव विकसित होत आहे.

साहसी पर्यटन, स्कुबा डायव्हिंग, अंडरवॉटर एक्सप्लोरेशन आणि सागरी पर्यटन क्षेत्राला नवे परिमाण प्राप्त होणार आहे. महाराष्ट्राची ओळख देशातील अग्रगण्य साहसी पर्यटन स्थळ म्हणून निर्माण होण्यास मदत होणार आहे.

समुद्रतळावर स्थापित करण्यात आलेली युद्धनौका कालांतराने कृत्रिम प्रवाळभित्ती (Artificial Reef) म्हणून विकसित होणार आहे.

तसेच त्यामुळे सागरी जैवविविधतेला पोषक वातावरण निर्माण होईल. विविध प्रकारचे मासे, सागरी वनस्पती आणि सूक्ष्म जीवांसाठी हे संरक्षित अधिवास ठरणार आहे.


हेही वाचा

दादर ते सिद्धीविनायक एसी बससेवा सुरू होणार

ॲक्वा लाईनमध्ये तांत्रिक बिघाड

पुढील बातमी
इतर बातम्या