भिवंडीत नायट्रोजन सिलेंडरचा स्फोट, २ कामगारांचा मृत्यू

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

भिवंडी (Bhiwandi) तालुक्यातील दापोडा इथल्या इजी मॅकेनिकल कंपनीत नायट्रोजन सिलेंडरचा भीषण स्फोट झाला. या स्फोटामध्ये २ जणांचा मृत्यू झाला आहे. तर या दुर्घटनेमध्ये ४ कामगार गंभीर जखमी झाले आहेत.

नारपोली पोलीस ठाणे हद्दीतील पारसनाथ कंपाऊंड गाळा नंबर बी-5 वळपाडा येथील जे.ई.मेकॅनिकल कंपनीमध्ये लोखंड कटिंग करण्यासाठी वापरला जाणारा नायट्रोजन गॅसच्या सिलेंडरचा दुपारी १.४० च्या सुमारास स्फोट होण्याची दुर्घटना घडली. या कंपनीत स्टीलचे कटिंग आणि वेल्डिंगचे काम करण्यात येते. आज काम सुरू असताना मोठा स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की, कंपनीबाहेर उभ्या केलेल्या दुचाकीचेही नुकसान झाले आहे.

या स्फोटामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. जखमी कामगारांना तातडीनं ठाण्यातील रुग्णालयात हलवण्यात आले होते. परंतु, उपचारादरम्यान, दोन जणांचा मृत्यू झाला. प्रेम अनंता भोईर आणि अक्षय अशोक गौतम अशी मृतांची नाव आहे.

तर मुनीर मोहम्मद, हुसेन मोमीन आणि बजरंग शुक्ला हे तिघेजण जखमी झाले आहे. हे तिन्ही जखमी कामगार लोटस हॉस्पिटल मानकोली इथं उपचार घेत आहेत. तर अल्पेश भोईर या कामगाराला ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल होत त्यांनी अपघाताची नोंद केली आहे.


हेही वाचा

फोर्टमधल्या किताब खाना पुस्तकांच्या दुकानात आग

लालबाग सिलिंडर स्फोटातील मृतांच्या कुटुंबीयांना २ लाखांची मदत

पुढील बातमी
इतर बातम्या