Advertisement

लालबाग सिलिंडर स्फोटातील मृतांच्या कुटुंबीयांना २ लाखांची मदत

लालबाग येथील साराभाई मेन्शन इमारतीमधील मंगेश राणे यांच्या घरात रविवारी सकाळी गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला, तर १४ जण जखमी झाले.

लालबाग सिलिंडर स्फोटातील मृतांच्या कुटुंबीयांना २ लाखांची मदत
SHARES

लालबाग येथील सिलिंडर स्फोट दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना दोन लाख तर जखमींना पन्नास हजार रुपयांची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. तसंच जखमींवर पालिका रुग्णालयात मोफत उपचार केले जातील, असं महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं आहे. 

लालबाग येथील साराभाई मेन्शन इमारतीमधील मंगेश राणे यांच्या घरात रविवारी सकाळी गॅस सिलिंडरचा स्फोट  झाला. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला, तर १४ जण जखमी झाले. राणे यांचा कॅटरिंगचा व्यवसाय होता. व्यवसायासाठी लागणारे साहित्य, तसेच व्यावसायिक वापराचे गॅस सिलिंडर त्यांनी या खोलीत ठेवले होते. खोलीतून गॅसगळती होत असल्याचे येथील रहिवाशांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिले होते. रविवारी सकाळी काही करण्याआधीच सिलिंडरचा स्फोट झाला आणि दुर्घटना घडली. 

केईएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल जखमींपैकी आतापर्यंत २ जणांचा मृत्यू तर ३ जखमींना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या केईएम रुग्णालयात ७ जखमीवर उपचार सुरू आहेत. एका जखमींवर ६ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. परंतु संपूर्ण खर्च माफ करण्यात येईल, अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. 

दरम्यान, या दुर्घटनेप्रकरणी काळाचौकी पोलिस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगेश राणे आणि त्यांचा मुलगा यश राणे यांच्यावर हा गुन्हा दाखल झाला असून, रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई होण्याची शक्यता आहे.





Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा