लोकल ट्रेनवर दगडफेक, दोन महिला जखमी

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

शिवडी आणि वडाळा रेल्वे स्थानकांत धावत्या लोकलवर दगडफेकीच्या दोन घटना घडल्या. पहिली घटना गुरूवार 18 सप्टेंबर रोजी शिवडी स्थानकात घडली. अज्ञान व्यक्तीने केलेल्या दगडफेकीत एका महिलेच्या डोळ्याला दुखापत झाली. दुसरी घटना वडाळा रेल्वे स्थानकात सोमवारी घडली. या दगडफेकीत 21 वर्षीय तरुणी जखमी झाली.

उपनगरील लोकलवर अलिकडेच दगडफेक झाल्याच्या दोन घटना समोर आल्या आहेत. दोन्ही घटनांमध्ये महिला जखमी झाल्या आहेत. या प्रकरणी वडाळा रेल्वे पोलिसांनी (जीआरपी) गुन्हा दाखल केला आहे.

दगडफेकीची पहिली घटना गुरूवार, 18 सप्टेंबर रोजी घडली. वडाळा पूर्व येथे राहणाऱ्या अनुराधा साव (39) गुरूवार 18 सप्टेंबर रोजी सीएसएमटी स्थानकातून संध्याकाळी 7.07 च्या सीएसएमटी – गोरेगाव धीम लोकलमध्ये चढल्या.

महिलांच्या शेवटच्या डब्यातून त्या प्रवास करीत होत्या. शिवडी रेल्वे स्थानक ओलांडल्यानंतर त्या वडाळा स्थानकात उतरण्यासाठी दरवाज्याजवळ आल्या.

संध्याकाळी 7.30 च्या सुमारास रेल्वे रुळाजवळ उभ्या असलेल्या एका व्यक्तीने त्यांच्या दिशेने दगड भिरकावला. हा दगड आधी त्यांच्या मोबाइलवर आपटून नंतर थेट त्यांच्या डाव्या डोळ्यावर आदळला. यात त्यांना किरकोळ दुखापत झाली. त्यांना उपचारसाठी लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर त्यांनी वडाळा रेल्वे पोलीस ठाण्यात जाऊन याप्रकरणी तक्रार दाखल केली.

दगडफेकीची दुसरी घटना वडाळा रेल्वे स्थानकाजवळ सोमवारी घडली. हर्षदा पवार (21) ही तरुणी सोमवारी संध्याकाळी आपल्या कार्यालयातून परत येत होती. हर्षदा गर्दीमुळे गाडीच्या फूटबोर्डवर उभी होती. कॉटन ग्रीन आणि रे रोड स्थानकांदरम्यान गाडी असताना, अज्ञात व्यक्तीने अंधारात फेकलेला दगड तिच्या चेहऱ्यावर आदळला. तिला तातडीने उपचारासाठी दवाखान्यात नेण्यात आले.

दगडफेकीच्या या दोन्ही घटनांविरोधात वडाळा रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसी टीव्हीच्या मदतीने आरोपींचा शोध घेण्यात येत असल्याचे वडाळा रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरशुद्दीन शेख यांनी सांगितले.


हेही वाचा

अलिबागमध्ये पर्यटकांना दुचाकी भाड्याने घेता येणार

नवरात्रोत्सवात महालक्ष्मी मंदिराला जाणाऱ्यांसाठी जादा बसेस धावणार

पुढील बातमी
इतर बातम्या