टाईपरायटर मोजतोय शेवटची घटीका

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

एका जमान्यात आपल्या खटखडाटानं अख्ख सरकारी कार्यालय व्यापून टाकणारा टाईपरायटर इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहे. राज्य सरकारनं सरकारी नोकरीसाठी यापुढे टायपिंगची परीक्षा टाईपरायटर ऐवजी कम्प्युटरवर घेण्याचा निर्णय घेतल्यानं सरकारी कचेऱ्यांमध्ये टाईपरायटरचा वापर करणारी ही बहुधा कर्मचाऱ्यांची शेवटचीच फळी असेल.

खरं तर सरकारी कचेऱ्यांतील टेबलावरील जुनाट फाईलींच्या जागी चकचकीत डेस्कटॉप कम्प्युटरनं शिरकाव करताच टाईपरायटरच्या अस्तित्वाला ग्रहण लागलं होतं. पण कुठलाही बदल एका रात्रीत घडून येत नाही. हे ठाऊक असल्याप्रमाणं टाईपरायटर स्वत: मध्ये वापरकर्त्यांच्या सोईचे बदल करत, इतकी वर्षे आपलं अस्तित्व टिकवून होता. पण एका सरकारी अध्यादेशानं किमान राज्यापुरता का होईना या अस्तित्वाला मोठा धक्का लावण्याचं काम केलं आहे.

कम्प्युटरच टायपिंग

स्टेनो, लिपिक, टंकलेखक, क्लार्क या शासकीय नोकरीतील विविध पदांसाठी टायपिंग परीक्षा उत्तीर्ण असणं बंधनकारक असतं. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये बहुतेक सर्वच शासकीय कार्यालयांमध्ये कम्प्युटर बसवण्यात आल्याने सर्व टायपिंग कम्प्युटरच्या की-बोर्डवर होऊ लागले आहे. त्यामुळे टाईपरायटर मशीनची या कार्यालयांना आवश्यकता उरलेली नसल्यानं ते कालबाह्य ठरले आहेत.

इन्स्टिट्यूटवर आपत्ती

सरकारी नोकरीसाठी टाईपरायटरवर परीक्षाच होणार नसेल, तर विद्यार्थी टायपिंग शिकण्यासाठी टायपिंग इन्स्टिट्यूटमध्ये जातील तरी कशाला? यामुळं टायपिंग इन्स्टिट्यूट चालविणाऱ्या संस्थांवरही मोठी आपत्ती ओढावणार आहे.

डिजिटायझेशनचा नारा

टेकसॅव्ही खासगी कार्यालयांमध्ये तशीही टायपिस्टची गरज उरलेली नाही. जे उरलेसुरलेले टायपिस्ट आहेत, ते सरकारी कार्यालय, न्यायालयात किंवा या कार्यालयांबाहेर आपली दुकानं चालवत आहेत. त्यातच मोदी सरकार डिजिटायझेशनला प्रोत्साहन देत असल्यानं टाईपरायटरची उपयोगिता आता देशभरातील सरकारी कार्यालयातूनही संपुष्टात येत आहे.

सीएसटी स्थानकाबाहेर टायपिंगचा व्यवसाय करणारे विनोद भूषण या निर्णयाबद्दल म्हणाले, ''पूर्वी माझ्याकडे प्रामुख्याने अॅफिडेव्हीट आणि इतर कायदेशीर दस्तावेज टाईप करण्याचे काम मोठ्या प्रमाणात यायचे. हे दस्तावेज टाईप करून माझे हात दुखायचे. पण जसजसा कम्प्युटरचा वापर वाढू लागला, तसे माझ्याकडे येणारे कामही कमी झाले. कम्प्युटरच्या जमान्यात टाईपरायटरचा आता फार उपयोग उरलेला नाही.''


हे देखील वाचा -

टायपिस्ट हाच विरोधकांमधला दुवा-मुख्यमंत्री


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

 

पुढील बातमी
इतर बातम्या