टायपिस्ट हाच विरोधकांमधला दुवा-मुख्यमंत्री

  Malabar Hill
  टायपिस्ट हाच विरोधकांमधला दुवा-मुख्यमंत्री
  मुंबई  -  

  आगामी पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सालाबादप्रमाणेच यंदाही सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप आणि कोपरखळ्यांचा डाव रंगला आहे. मात्र यंदाचा डाव हा काहीसा वेगळा ठरतोय तो विरोधकांच्या बहिष्काराच्या अजब पद्धतीने आणि मुख्यमंत्र्यांनी विरोधकांमधला दुवा हेरल्यामुळे!

  सोमवारपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्व संध्येला सह्याद्री अतिथीगृहावर पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर तोंडसुख घेतले.


  विरोधी पक्षांनी सरकारकडे दिलेल्या पत्रातील मुद्देच नव्हे, तर स्वल्पविराम आणि पूर्णविराम याच्यामध्येही काडीचाही फरक नाही. त्यामुळे ही पत्र टाईप करणारा टायपिस्ट हाच विरोधी पक्षांमधला खरा दुवा आहे.

  देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री


  विरोधकांनी घातला नवा पायंडा

  विरोधी पक्षाला प्रथेप्रमाणे चहापानाला बोलावले होते. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी वेगवेगळ्या बैठका घेऊन यावर बहिष्कार घातला. राज्याच्या इतिहासात बहुधा पहिल्यांदाच अशा प्रकारे विरोधी पक्षांनी स्वतंत्रपणे बहिष्कार घातला असावा. त्यामळे विरोधकांनी हा नवाच पायंडा घातला आहे असेही यावेळी मुख्यमंत्री म्हणाले.


  विरोधकांनी कायम विरोधी बाकांवर बसावं!

  विरोधकांनी एकत्र रहावं, अशीच आमची इच्छा आहे. मात्र त्यांनी कायम विरोधी पक्षात बसावे असे आम्हाला मनापासून वाटत असल्याची कोपरखळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी मारली.


  अधिवेशनात एकूण 21 विधेयके

  या पावसाळी अधिवेशनात 14 नवीन विधेयके प्रस्तावित असून, 7 प्रलंबित विधेयके चर्चेला येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.


  शेतकरी कर्जमाफीचं काय?

  शेतकरी कर्जमाफीची ऑनलाइन प्रक्रिया सोमवारपासून सुरू होणार आहे. राज्यात 25 हजार केंद्रे तयार करण्यात आली असून, ही सगळी प्रक्रिया महिन्याभरात पूर्ण होईल, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. अतिशय सोपा फॉर्म आहे. आधार क्रमांक आवश्यक केला आहे. यात फक्त चार ते पाच प्रकारची माहिती भरावी लागणार आहे. अकाऊंट नंबर, त्यांची माहिती, कुटुंबाची माहिती ही सगळी माहिती त्यामध्ये द्यावी लागणार आहे. यापूर्वी कर्जकाफीच्या वेळी जे घोटाळे झाले, ते पुन्हा होऊ नयेत यासाठी सरकारने ही खबरदारी घेतल्याचे त्यांनी सांगितले.


  दुकानदारी करणाऱ्यांना सडेतोड उत्तर

  सुकाणू समिती आजही आपल्या आंदोलनावर ठाम आहे याबाबत विचारले असता मुख्यमंत्र्यांनी राजकीय दुकानदारी चालवणाऱ्या अव्यवहार्य मागण्या आम्ही स्वीकारणार नाही, तर त्याला सडेतोड उत्तर देऊ, असा इशारा यावेळी दिला.


  विधिमंडळातील प्रस्तावात बाळासाहेबांचं नाव का नाही?

  विधिमंडळात मांडल्या जाणाऱ्या गौरव आणि अभिनंदन प्रस्तावात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव का नाही? या प्रश्नाा उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, "बाळासाहेब ठाकरे हे सर्व राजकीय पक्षांसाठी आदराचे स्थान आहेत. आताच्या प्रस्तावामध्ये बाळासाहेबांचे नाव नाही, कारण हा वेगळा प्रस्ताव आहे." बाळासाहेबांच्या स्मारकाचे विधेयक सर्व पक्षांनी आधीच मान्य केल्याचेही त्यांनी सांगितले.


  वादावर टाकला पडदा

  इंदिरा गांधी आणि शरद पवार यांच्यापैकी कोणाचा प्रस्ताव आधी घ्यायचा, यावरून विरोधकांमध्ये वाद असला तरी सरकार म्हणून आम्ही या सर्व महनीय व्यक्तींकडे समान दृष्टिकोनातून पाहत आहोत, प्रत्येकाची एक वेगळी उंची आहे. त्यामुळे सन्मान कायम ठेवून आम्ही मार्ग काढू असे सांगत मुख्यमंत्र्यानी विरोधकांनी निर्माण केलेल्या वादावर पडदा टाकला.  हेही वाचा

  पावसाळी अधिवेशनात सत्ताधाऱ्यांची होणार गोची?

  मुख्यमंत्री वापरणार चश्मा आणि श्रवणयंत्र?


  डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

  मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

  (खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या) 


  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.