मुख्यमंत्री वापरणार चश्मा आणि श्रवणयंत्र?

  Mumbai
  मुख्यमंत्री वापरणार चश्मा आणि श्रवणयंत्र?
  मुंबई  -  

  राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता आणि गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांना अनोखी भेट देण्याचा निर्णय बीडीडी चाळवासीयांनीघेतला आहे. ही भेट म्हणजे चश्मा आणि श्रवणयंत्र. आधी करार मग पुनर्विकास अशी मागणी गेल्या कित्येक महिन्यांपासून अखिल बीडीडी चाळ सर्व संघटना एकत्रित संघाकडून केला जात आहे. मात्र ही मागणी मुख्यमंत्री आणि गृहनिर्माणमंत्र्यांना ऐकू येत नसून बीडीडी पुनर्विकासातील भ्रष्टाचारही या सरकारला दिसत नाही. त्यामुळे या मूक-बधीर सरकारचे डोळे आणि कान उघडे करण्यासाठी चश्मा आणि श्रवणयंत्र भेट म्हणून लवकरच देणार असल्याची माहिती एकत्रित संघाचे अध्यक्ष डॉ. राजू वाघमारे यांनी दिली आहे.

  सॅनिटरी नॅपकिन्सवर जीएसटी लागू करण्याच्या मु्द्दयावरून काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीने देशाचे पंतप्रधान आणि केंद्रीय अर्थमंत्र्यांनातसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला आघाडीने राज्याच्या अर्थमंत्र्यांना सॅनिटरी नॅपकिन्स भेट म्हणून पाठवली होती. या पार्श्वभूमीवर बीडीडी चाळवासीयांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहनिर्माण मंत्र्यांना चश्मा आणि श्रवणयंत्र देण्याचे ठरवले आहे.  

  संघर्ष जारी...

  बीडीडी पुनर्विकासावरून सरकार, म्हाडा विरूद्ध बीडीडीवासीय असा वाद दिवसेंदिवस चिघळतच चालला आहे.बीडीडीवासीयांशी करार केल्याशिवाय पुनर्विकास होऊच दिला जाणार नाही अशा कडक इशारा देत बीडीडीवासीयांनी बायोमेट्रीक सर्व्हे दोनदा हाणून पाडला. त्यामुळे पात्रता निश्चितीची महत्त्वाची प्रक्रिया ठप्प झाली असून त्याचा परिणाम म्हणून प्रकल्प रेंगाळणार आहे, असे म्हटले जात आहे. या परिस्थितीत म्हाडा वा सरकारकडून मात्र बीडीडीवासीयांशी चर्चा करत यातून मार्ग काढण्यासाठी कोणतीही ठोस पावले उचलली जात नसल्याचे चित्र आहे. परिणामी हा प्रश्न 'जैसे थे' राहिला आहे. 

  बीडीडीवासीयांचा बायोमेट्रीक सर्व्हे करायचा आणि त्यांना संक्रमण शिबिराच्या नरकात ठकलून द्यायचा असा डाव असल्याचा आरोपही एकत्रित संघाने केला आहे. त्यामुळेच करार करत पुनर्विकासातील हक्काच्या घराची हमी देण्याची मागणी बीडीडीवासियांनी केली आहे.

  सह्यांची मोहीम

  बीडीडी पुनर्विकासाविरोधातील आंदोलन तीव्र करण्यासाठी आता एकत्रित संघाने सह्यांची मोहिम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. 'आधी करार मग पुनर्विकास' या मागणीसंदर्भातील निवेदनासह सह्यांची मोहीम राबवण्यात येणार आहे. अधिकाधिक सह्या घेत हे निवेदन सरकारकडे सादर करण्यात येणार आहे. त्याचवेळी मुख्यमंत्री आणि गृहनिर्माण मंत्री, गृहनिर्माण राज्यमंत्री यांनी चश्मा आणि श्रवणयंत्र देण्यात येणार असल्याचे एकत्रित संघाने स्पष्ट केले आहे. 

  चश्मा आणि श्रवणयंत्र देण्याचा बीडी़डीवासीयांनी घेतलेला निर्णय अंमलात आणला जाईल, की नाही याविषयी शाश्वती देता येणार नाही. मात्र हा निर्णय जाहीर करून आंदोलनाची धुगधुगी वाढवण्यात बीडीडीवासीय यशस्वी ठरले आहेत. 


  डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

  मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

  (खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या) 

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.