Advertisement

बीडीडीकरांनी पुन्हा केला बायोमेट्रीकचा विरोध


बीडीडीकरांनी पुन्हा केला बायोमेट्रीकचा विरोध
SHARES

नायगाव आणि ना.म. जोशी मार्ग येथील बीडीडी चाळीतील रहिवाशांची शुक्रवारची सकाळ रोजच्या पेक्षा थोडी वेगळीच होती. दररोज आपापल्या कामात व्यस्त असणारे बीडीडीतील रहिवाशी, कुटुंब शुक्रवारी मात्र आपली सर्व कामे बाजूला ठेवून चक्क घराला टाळे लावून रस्त्यावर उतरले आणि त्यांनी बायोमेट्रीक सर्व्हेक्षण पुन्हा हाणून पाडले. आधी करार, संमती मग बायोमेट्रीक असे म्हणत उपजिल्हाधिकारी आणि म्हाडा अधिकाऱ्यांकडून सुरू करण्यात आलेल्या बायोमेट्रीक सर्व्हेक्षणाला पुन्हा जोरदार विरोध करत नायगाव येथील बीडीडीतील रहिवाशांनी अधिकाऱ्यांना इमारतीमध्ये शिरूही दिले नाही. त्यामुळे नायगावमध्ये बायोमेट्रीक झाले नाही तर ना.म. जोशी मार्ग येथेही रहिवाशांनी बायोमेट्रीकला जोरदार विरोध केला. पण ना.म. जोशी मार्ग येथील काही रहिवाशी प्रकल्पाचे समर्थक असल्याने एक-दोन इमारतीत बायोमेट्रीक झाल्याची माहिती आहे.

करार झाल्याशिवाय बायोमेट्रीक होऊ दिला जाणार नाही वा बायोमेट्रीकची गरजच नाही, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रेकॉर्डनुसार पात्रता ठरवावी असे म्हणत अखिल बीडीडी चाळ सर्व संघटनांचा एकत्रित संघाने बायोमेट्रीकला विरोध दर्शवला आहे. त्यामुळे 17 मे रोजी पहिल्यांदा जेव्हा बायोमेट्रीक करण्याचा प्रयत्न म्हाडा आणि उपजिल्हाधिकाऱ्यांकडून करण्यात आला तेव्हा बीडीडीवासीयांनी जोरदार विरोध करत सर्व्हेक्षण हाणून पाडले. त्यानंतर आता पुन्हा शुक्रवारी जवळपास दोन महिन्यांनंतर म्हाडाने बायोमेट्रीक सर्व्हेक्षणाचा घाट घातला आहे. पण एकत्रित संघाने दुसऱ्यांदाही बायोमेट्रीकचा डाव हाणून पाडला आहे.

नायगाव येथे शुक्रवारी संघाचे अध्यक्ष राजू बाघमारे याच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने रहिवाशी रस्त्यावर उतरले. यावेळी मोठ्या संख्येने पोलिस बंदोबस्तही होता. रहिवाशांनी म्हाडा, सरकार आणि स्थानिक आमदारांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पोलिस बळाचा वापर करत अधिकारी इमारतीत शिरले तरी बायोमेट्रीक होऊ नये यासाठी रहिवाशांनी चक्क घराला टाळे लावले होते. दरम्यान ना. म. जोशी येथील काही रहिवाशांचे बायोमेट्रीक झाल्याचे बीडीडी चाळ उपक्रम सेवा समितीचे कृष्णकांत नलगे यांनी सांगितले आहे.

वाघमारे यांनी मात्र शुक्रवारी एकाही रहिवाशाचा बायोमेट्रीक सर्व्हे झाला नाही, होऊ दिला नाही, असा दावा केला आहे. तर यासंबंधी म्हाडाच्या संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. दरम्यान दुपारनंतर अधिकाऱ्यांनी येथून पळ काढल्याचे समजते आहे. तर शनिवारीही बायोमेट्रीक सर्व्हेक्षण होऊ दिले जाणार नाही, असा इशारा वाघमारे आणि रहिवाशांनी दिला आहे.


हेही वाचा -

बीडीडी चाळधारकांचे आधी बायोमेट्रिक, मगच करार - वायकर 


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा