Advertisement

बीडीडीवासीयांना हवंय 685 चौ. फुटांचं घर


बीडीडीवासीयांना हवंय 685 चौ. फुटांचं घर
SHARES

म्हाडा वसाहतीच्या 33 (5) पुनर्विकास धोरणात नुकतीच सुधारणाकरण्यात आली आहे. या सुधारणेनुसार म्हाडातील रहिवाशांना किमान 376 चौ. फुटाचे घर तसेच फंजिबल आणि इतर अतिरिक्त क्षेत्रफळ गृहीत धरता 500 चौ. फुटांपेक्षा मोठे घर मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याच धर्तीवर 33 (5) अंतर्गत बीडीडी चाळींचा पुनर्विकास करावा, अशी नवी मागणी अखिल बीडीडी चाळ सर्व संघटनांच्या एकत्रित संघाकडून केली जात आहे.

यासंबंधीचे निवेदन म्हाडा उपाध्यक्षांना देण्यात आले असून सविस्तर प्रस्ताव लवकरच उपाध्यक्षांना पाठवण्यात येणार असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष डाॅ. राजू वाघमारे यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली आहे. महत्त्वाचे म्हणजे 33 (5) अंतर्गत बीडीडीचा पुनर्विकास झाल्यास बीडीडी चाळीत राहणाऱ्या रहिवाशांना 685 चौ. फुटांचे घर मिळू शकणार आहे.

बीडीडी चाळींचा पुनर्विकास 33 (9) ब 3 अंतर्गत करण्यात येत असून त्यासाठी स्वतंत्र धोरण तयार करण्यात आले आहे. मात्र कुठल्याही पुनर्विकास धोरणाअंतर्गत रहिवाशांची संमती घेणे बंधनकारक असताना या धोरणात मात्र रहिवाशांच्या संमतीची अटच रद्द करण्यात आलेली आहे. त्यामुळेच रहिवाशांनी या प्रकल्पाला विरोध दर्शवला आहे.

या विशेष धोरणांतर्गत बीडीडीतील रहिवाशांना 500 चौ. फुटांचे घर देण्यात येणार आहे. असे असताना गेल्या आठवड्यात म्हाडा वसाहतींच्या पुनर्विकासासंबंधीच्या सुधारीत धोरणाला मंजुरी मिळाली. त्यामुळे आता बीडीडीतील रहिवाशांनी या सुधारीत धोरणाअंतर्गत बीडीडीचा पुनर्विकास करण्याची मागणी केली आहे.



असे मिळेल 685 चौ. फुटांचे घर

बीडीडी चाळींचा पुनर्विकास 33 (5) ने केल्यास रहिवाशांना किमान 376 चौ. फुटाचे घर मिळेल. त्यावर 35 टक्के फंजिबल आणि 2013 च्या समुह पुनर्विकास धोरणानुसार नायगाव आणि वरळीसाठी आणखी 35 टक्के अतिरिक्त क्षेत्रफळ मिळेल. 33 (5) च्या धोरणानुसार म्हाडा प्रकल्प राबवत असल्याने आणखी 15 टक्के अतिरिक्त क्षेत्रफळ, असे मिळून 685 चौ. फुटापर्यंतचे मोठे घर मिळू शकेल, असा दावा एकत्रित संघाने केला आहे.


बीडीडीसाठी 33 (5) अशक्य

33(5) चे धोरण हे केवळ म्हाडा वसाहतींसाठीच लागू आहे. बीडीडी चाळी म्हाडा वसाहती नाहीत तसेच 33 (5) धोरण बीडीडीसाठी परवडणारे नाही, असे म्हणत म्हाडाने 33 (5) नुसार बीडीडीचा पुनर्विकास करण्यास सुरूवातीपासूनच नकार दर्शवला आहे. त्यामुळेच बीडीडीसाठी स्वतंत्र 39 (9) ब 3 धोरण तयार करण्यात आले.


म्हाडाच बीडीडीचे मालक

बीडीडी पुनर्विकासासाठी केंद्राकडून बीडीडीच्या जागेचे हस्तांतरण म्हाडाकडे करण्यात आले आहे. प्राॅपर्टी कार्डवर म्हाडाचे नाव लागले असून बीडीडीची मालकी कायद्याने म्हाडाकडे आहे. त्यामुळे म्हाडा मालक नाही, असे म्हाडा खोटे सांगत असल्याचा आरोप डाॅ. वाघमारे यांनी केला आहे. म्हाडाकडे मालकी आल्यामुळेच प्रकल्प मार्गी लागल्याचा खुलासाही त्यांनी केला आहे.

महत्त्वाचे म्हणजे आता मालकी म्हाडाकडे आल्याने बीडीडीच्या वसाहतीही म्हाडाच्या वसाहती झाल्या. मग या वसाहतींचा पुनर्विकास 33 (5) नुसार करणे कसे काय शक्य नाही? असा सवाल करत म्हाडाच्या धोरणावरच आता एकत्रित संघाने संशय घेतला आहे. बीडीडीतील रहिवाशांच्या नव्या मागणीचा म्हाडा विचार करते की या मागणीकडे कानाडोळा करते हे पाहणे आता महत्त्वाचे ठरेल.



हे देखील वाचा -

बीडीडीतील बायोमेट्रीकचा वाद पुन्हा चिघळणार?



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

 


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा