राष्ट्रीय महामार्गावरील अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

वसई-विरार शहरातून जाणाऱ्या मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मातीचा भराव करून अनधिकृत (illegal) हॉटेल्स, गॅरेज, ढाबे आणि इतर आस्थापने उभारण्यात आली आहेत.

या अनधिकृत बांधकामावर वनविभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व वसई-विरार शहर महानगरपालिका (vvmc) यांच्या संयुक्त पथकाने धडक कारवाई सुरू केली आहे.

वसई पूर्वेकडून (vasai road) मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग जातो. मुंबई (mumbai), गुजरात आणि इतर भागांना जोडणारा हा अत्यंत महत्त्वाचा महामार्ग असल्याने यावरून वाहनांची मोठी वर्दळ सुरू असते.

मात्र, मागील काही वर्षांपासून महामार्गालगत बेकायदेशीरपणे मातीचा भराव टाकून अनधिकृत हॉटेल्स, ढाबे, टपऱ्या व दुकाने थाटण्याचे प्रमाण वेगाने वाढले होते.  या अनधिकृत बांधकामांमुळे पावसाचे पाणी वाहून नेणारे मार्ग बंद झाले होते.

तसेच, या हॉटेल्स व आस्थापनांमध्ये येणाऱ्या ग्राहकांची वाहने थेट मुख्य रस्त्यावरच उभी राहत असल्याने मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत होती; शिवाय अपघातांच्या घटनांमध्येही वाढ झाली होती.

पालकमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत महामार्गावरील या अतिक्रमणांचा मुद्दा चांगलाच गाजला होता.

या पार्श्वभूमीवर, जिल्हाधिकारी डॉ. इंदूराणी जाखड यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष कारवाई मोहीम आखण्यात आली. वनविभागाने केलेल्या सर्वेक्षणात तब्बल ११४ अतिक्रमणे आढळली आहे.

जवळपास 73 हजार 831 चौरस मीटर क्षेत्रावर हे अनधिकृत बांधकाम करण्यात आले होते.

राखीव व संरक्षित वनक्षेत्रात वर्षानुवर्षे ठिय्या मांडून बसलेल्या या व्यावसायिकांना प्रशासनाने कारणे दाखवा नोटिसा बजावत कायदेशीर कारवाईचा फास आवळण्यास सुरुवात केली.

तसेच त्यानुसार जुलैच्या अखेरच्या आठवड्यात महामार्ग प्राधिकरणाने महापालिका व पोलीस प्रशासनाच्या मदतीने 80 हून अधिक अतिक्रमित मालमत्तांवर प्रत्यक्ष निष्कासनाची कारवाई करत रस्ता मोकळा केला आहे.


हेही वाचा

पनवेल मत्स्यालय आणि सी लायन मनोरंजन केंद्राच्या कामाला गती

रेल्वे कॅटरिंगवर पश्चिम रेल्वेची करडी नजर

पुढील बातमी
इतर बातम्या